पुणे: पुण्यातील भोर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. झोपेतून उठल्यानंतर आईला हाक मारत असताना अचानक चक्कर येऊन एका 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अक्षय देविदास रिंगे ( वय 28 वर्ष) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना रविवारी दुपारी घडली. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली असून त्याचा मृत्यू हृदयाविकाराच्या झटक्याने झाला असावा अशी शक्यता व्यक्त केली जातं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय रविवारी सकाळी नदीत पोहण्यासाठी गेला होता. त्यानंतर घरी येऊन त्याने थोडा नाश्ता केला. तेंव्हा अक्षयला अस्वस्थ वाटू लागले. अस्वस्थ वाटू लागल्याने त्यामुळे तो थोडावेळ झोपला. दुपारी झोपेतून उठताना त्याला अचानक चक्कर आली. त्यावेळेस त्याने आईला हाक मारली आणि खाली पडला. त्यानंतर घरातील व्यक्तींनी त्याला तातडीने रुग्णलायत दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
दरम्यान, भोरमधील राजगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. अक्षयच्या मृत्यूमागील कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र हृदयाविकाराने हा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर नेमकं मृत्यूचं कारण समोर येईल.
कुटुंबीयांसह मित्र आणि संपूर्ण गावावर शोककळा
दरम्यान, अक्षय हा गावातील सामाजिक कार्यात नेहमी सक्रिय सहभागी व्ह्यायचा. त्याचे सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध होते. अक्षय अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याने गावकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. त्याच्या अकाली निधनाने कुटुंबीयांसह मित्र आणि संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. अंत्यविधीच्यावेळी मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते. अक्षयच्या पश्चात आई, भाऊ, बहीण असा परिवार आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.