पुणे-सोलापूर (Pune) रस्त्यावर मांजरी परिसरातील भरधाव कंटेनर ट्रक आणि मोटारसायकल यांच्या झालेल्या जोरदार धडकेत मोटारसायकल स्वाराचा मृत्यू झाला आहे. हा भीषण अपघात शेवाळवाडी परिसरात घडला आहे. या धडकेत लोणीक काळभोर येथील कवडीपाट येथील एका तरुणाचा मृत्यू झाला असून एक तरुण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 मार्च 2025 रोजी रात्री 1 वाजताच्या सुमारास हा अपघात घडला आहे. दरम्यान, या अपघातात लोणीक काळभोर येथील कवडीपाट येथील 23 वर्षीय प्रवासी सौरभ कैलास इंदलकर यांचा मृत्यू झाला असून कवडीपाट येथील सूरज कदम (१८) हा मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, अपघातानंतर घटनास्थळावरून पळून गेलेल्या कंटेनर चालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक बर्गे या प्रकरणाचा तपास करत आहे.
पुणे-सोलापूर रस्त्यावरील गंभीर अपघातांमध्ये वाढ झाल्याने चिंता वाढली आहे, कारण यातील अनेक घटना जड वाहनांच्या वेगाने होणाऱ्या अपघातांमुळे घडतात. अपघात घडला तेव्हा सूरज आणि सौरभ हे दोघे तरुण मोटारसायकल वर एकत्र प्रवास करत होते. दरम्यान, मागून येणाऱ्या कंटेनर ट्रकने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता कि, दोघे तरुण गंभीर जखमी झाले होते. दोन्ही जखमींना तातडीने खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तपासून सौरभला मृत घोषित केले आणि जखमी सूरजवर अद्याप उपचार सुरु आहेत.