शिक्रापूर, (पुणे) : घरातील कामानिमित्त बाहेर गेल्याचे पाहून 19 वर्षीय तरुण प्रेमीयुगुलाने घरात एकाच दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शिक्रापूर (ता. शिरूर) येथील करंजेनगर परिसरात मंगळवारी (ता. ०4) सायंकाळी हि घटना उघडकीस आली आहे. तसेच घटनास्थळावर एक चिठ्ठी मिळाली आहे.
गणेश सखाराम कुडले (वय 19, सध्या रा. शिक्रापूर, ता. शिरूर जि. पुणे, मूळ, रा. मांदेडे, ता. मुळशी, जि. पुणे) व अनिषा संजय चांदेकर (वय 19, रा. अंडल, ता. मावळ, जि. पुणे) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत सखाराम श्रीपती कुडले (वय 19, सध्या रा. शिक्रापूर, ता. शिरूर, जि. पुणे, मूळ रा. मांदेडे, ता. मुळशी, जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
याबाबतची माहिती मिळताच पोलीस नाईक अतुल पखाले, विशाल देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रेमीयुगुल मुळशी तालुक्यातील माले येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत होते. गणेश यांचे वडिल नोकरीनिमित्त शिक्रापूर येथे स्थायिक होते. करंजेनगरमध्ये राहणारे सखाराम कुडले हे गावी गेलेले होते, त्यांचा मुलगा गणेश कुडले हा त्याची प्रेयसी अनिषा चांदेकर हिला घरी घेऊन आलेला होता.
मंगळवारी सायंकाळच्या सुमारास सखाराम हे गावाकडून शिक्रापूर येथे येण्यासाठी निघाले असताना त्यांनी शेजारी राहणाऱ्या व्यक्तीला फोन करून गणेशकडे फोन देण्यास सांगितले. शेजारील व्यक्ती कुडले यांच्या घरात गेले असता यांना गणेश व त्याच्या प्रेयसीने घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. याबाबतची माहिती मिळताच पोलीस नाईक अतुल पखाले, विशाल देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यांना घटनास्थळावर एक चिठ्ठी मिळून आली.
दरम्यान, या चिठ्ठीत ‘आम्ही आमच्या स्वेच्छेने आत्महत्या करत असून यात आमच्या कुटुंबाचा काही संबंध नाही, आमच्यामुळे ज्यांना त्रास होत होता त्यांना त्रास होणार नाही’ असा मजकूर चिठ्ठीत लिहिला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे हे करत आहेत.