शुभम वाकचौरे
जांबूत : ओतूर पोलीस स्टेशन हद्दीत मोबाईल चोरीच्या तक्रारी वाढल्या होत्या. येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे आणि टीमने चोरलेल्या ८५ मोबाईलचा शोध घेऊन ते मूळ मालकास परत केले. या सर्व मोबाईलची किंमत ७ ते ८ लाखांपर्यंत आहे. चोरट्यांनी जमिनीत पुरलेले फोन देखील पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या तपासणी करून शोधून काढला. याबद्दल पोलिसांच्या कार्याचे कौतूक होत आहे.
हे सर्व मोबाईल जुन्नरचे आमदार अतुल शेठ बेनके आणि ओतूर येथील प्रतिष्ठित ग्रामस्थांच्या उपस्थितीत त्यांना परत करण्यात आले. या पैकी काहींनी मोबाईल कर्ज काढून विकत घेतले होते. केवळ दोन हप्ते भरल्यानंतर त्यांचे मोबाईल चोरीस गेले होते. पोलीस स्टेशनला याबाबत लेखी तक्रार नोंदवल्यानंतर पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि पोलीस बांधवांच्या कार्यतत्परतेमुळे त्यांना मोबाईल परत मिळाले.
मोबाईल मिळाल्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर हसू फुलले. संक्रात गोड झाल्याबद्दल सर्वांनी सचिन कांडगे आणि त्यांच्या टीमचे तोंडभरून कौतुक केले. या वेळी कांडगे यांनी तरुणांना संदेश दिला. मोबाइलचा वापर कमी करा. आई-वडिलांकडे लक्ष द्या. व्यसनाच्या आहारी जाऊ नका. आपल्या कामावर लक्ष द्या, असा संदेश दिला.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस निरीक्षक (पुणे ग्रामीण) मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे, पोलीस हवलदार महेश पठारे, एन. बी. गोराणे, पोलीस नाईक बी. एस. सूर्यवंशी, पोलीस पाटील किरण भोर, राहुल हांडे, पोलीस मित्र छोटू मणियार यांनी मोबाईलचे वाटप केले.