पुणे : फेब्रुवारी 2024 मध्ये पवित्र पोर्टल मार्फत भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. या भरती प्रक्रियेमध्ये रयत शिक्षण संस्थेचा पर्याय निवडलेल्या 801 शिक्षकांना रयत शिक्षण संस्थेमध्ये यापूर्वीच भरती प्रक्रियेवर उच्च न्यायालयाकडून स्थगिती असल्यामुळे गेले 11 महिने पासून कुठेच नियुक्ती मिळू शकलेली नाही.
रयत सोडून इतर ठिकाणी आस्थापना बदलून देण्याच्या मागणीसाठी राज्यभरातून आलेल्या शिक्षकांच्या प्रतिनिधींनी शिक्षण मंत्री यांच्याशी सविस्तर चर्चा केली. तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सकारात्मक आदेश दिला असताना शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आस्थापना बदल नियुक्तीच्या प्रस्तावावर अजून सही केली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्यभरातील 800 शिक्षकांच्यामध्ये असंतोष पसरला आहे.
दरम्यान, शिक्षण विभाग व शिक्षण मंत्री हे 800 बेरोजगार शिक्षकांच्या जीवनाशी खेळत आहेत. यामुळे शिक्षकांच्यामध्ये नाराजीची भावना तयार झाली आहे. त्यामुळे पवित्र पोर्टल शिक्षक कृती समितीच्या वतीने सर्व शिक्षक शिक्षणमंत्री यांच्या घरासमोर आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.
होतेय घुसमट
निवड झालेल्या धाराशिव जिल्ह्यातील एका शिक्षिकेने सांगितले, ‘‘काम करीत परीक्षा दिली. 150 गुण मिळविले. निवड झाल्याने कौतुक झाले. पण, आता कधी रुजू होणार म्हणून नातेवाईक प्रश्न विचारत आहेत. त्यामुळे घुसमट होत आहे.’’