लोणी काळभोर, (पुणे) : दुचाकी गाडी घसरली म्हणून बघितल्याच्या कारणावरून आठ ते दहा जणांच्या दोन टोळक्यात मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत टोळक्याने तिघांना विटा, दगड हाताने मारहाण केली आहे. तर भांडण का बघते म्हणून महिलेला देखील मारहाण केली. कदमवाकवस्ती हद्दीतील आशीर्वाद हॉटेलच्या बाजूला तसेच शिवाजीराव भोसले बँकेच्या समोर ही घटना सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अजय शिंदे, अमित साबळे, गजानन शिराळे (रा. तिघेही समता नगर, लोणी स्टेशन, कदमवाकवस्ती, ता. हवेली) अशी मारहाण झालेल्या तिघांची नावे आहेत. तर शर्मा असे मारहाण झालेल्या महिलेच्या नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अजय शिंदे, अमित साबळे, गजानन शिराळे हे तिघेजण लोणी स्टेशन चौकातील आशीर्वाद हॉटेलच्या समोरून निघाले होते. यावेळी हॉटेलच्या बाहेर एक ८ ते १० जणांचे एक टोळके बाहेर पडले. यावेळी यातील काहीजण दुचाकी घेऊन जाताना दुचाकी घसरली. यावेळी अजय शिंदे व त्याच्या दोन्ही मित्रांनी पाठीमागे पाहिले.
यावेळी हॉटेलच्या बाहेर थांबलेल्या टोळक्याने या तिघांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी हे तिघे भोसले बँकेच्या बाजूला निघून गेले असता त्यांनी त्या ठिकाणी असलेल्या विटा, दगड फेकून मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी त्या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली. यावेळी याच गटातील काही जणांनी उभा राहिलेल्या नागरिकांनाही मारहाण केली. तसेच एका महिलेला चप्पलचा दणका दिला. काही नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधत या घटनेची तात्काळ माहिती दिली.
दरम्यान, सदर घटनेच्या ठिकाणी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण धायगुडे यांनी भेट दिली असून तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही सुरु आहे.