केडगाव (पुणे) : दौंड तालुक्यातील आलेगाव येथील दौंड शुगर साखर कारखाना कार्यस्थळावर (दि. 28 जुलै) कारखाना आणि औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, पुणे विभाग यांच्या सहकार्याने राज्यस्तरीय सुरक्षा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कामगाराची सुरक्षा कल्याण व आरोग्य हे महत्त्वाचे पैलू आहेत. कामाच्या ठिकाणी होणारे संभाव्य अपघात व आरोग्याचे धोके कमी करण्यासाठी सर्वांनीच जाणीव पूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे. यामुळे कारखान्याची उत्पादन क्षमता वाढण्यास निश्चित मदत होईल. परंतु सुरक्षा साधने वापरण्यास टाळाटाळ किंवा आळस, तसेच अति आत्मविश्वास यामुळे कारखान्यांमध्ये लहान-मोठे अपघात होतात. आपल्या कुटुंबाच्या व एकूणच देशाच्या उन्नतीसाठी आपण सर्वांनी सुरक्षिततेचे नियम पाळणे, उपकरणांचा वापर करणे आणि एकूण सुरक्षितता हे विषय गांभीर्याने घेणे ही काळाची गरज झाली आहे, असे मत महाराष्ट्र शासनाचे औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे सहसंचालक आखिल घोगरे यांनी व्यक्त केले.
कारखान्यांमध्ये 24 तास सुरू असलेली विविध यंत्रे आणि त्यांचे क्लिष्ट प्रक्रियांशी संबंधित तेथील कामगारांच्या सुरक्षिततेची व जीविताची सुरक्षा आपण समजून ही बाब गांभिर्याने घेतली पाहिजे. कामगार ज्या कंपनीमध्ये, ज्या यंत्रावर, ज्या परिस्थितीमध्ये, जे काम करत असतो. ते आपले काम, यंत्र व त्याचे तंत्र व्यवस्थित शास्त्रीयदृष्ट्या बारकाव्यानिशी समजून घेणे म्हणजेच औद्योगिक सुरक्षा. यंत्रामधील व कामकाजाशी संबंधित धोके याची पूर्ण माहिती घेणे, त्याची जाण असणे, त्याच्या अनुषंगाने संभाव्य धोके कसे टाळता येतील, त्यासाठी अवलंबल्या जाणाऱ्या उपाययोजना व सुरक्षित साधने यांचे ज्ञान व परिपूर्ण वापर करणे म्हणजे सुरक्षाच आहे. याला चालना देण्यासाठी कारखान्यामार्फत हा उपक्रम आयोजित केला आहे.
दौंड शुगर कारखान्यामार्फत राबविण्यात येणारे उपक्रम इतर कारखान्यासाठी निश्चित मार्गदर्शन ठरतील असा विश्वास कारखान्याचे संचालक वीरधवल जगदाळे यांनी व्यक्त केला. औद्योगिक, अभियांत्रिकी, रासायनिक, धोकादायक, अति धोकादायक आदी स्वरूपाचे लहान-मोठे अनेक उद्योगधंदे असतात. जेथे अनेक अकुशल ते प्रशिक्षित कामगार असतात. याठिकाणी बऱ्याचदा अनाहुतपणे किंवा अतिआत्मविश्वासामुळे किरकोळ, गंभीर दुर्घटना झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे प्रत्येकाने आपल्यावर कुटुंब अवलंबून आहे, याचा विचार करून कामगाराने व उद्योग व्यवस्थापनाने सुरक्षिततेचे नियम पाळणे अत्यंत गरजेचे आहे. उदा. हेल्मेट, सेफ्टी गॉगल्स, हॅंड ग्लोव्हज, बॉडी हार्नेस-ॲप्रन, बॉयलर सूट अथवा इतर सुरक्षा पोशाख, सेफ्टी शूज अशी सुरक्षा साधने कामगाराने धारण करणे गरजेचे आहे. असे मत कारखान्यांचे पूर्णवेळ संचालक शहाजी गायकवाड यांनी नमूद केले.
या कार्यक्रामावेळी अंकुश खराडे, प्रकाश सुतार, सुरेश घाडगे, यांनी विविध विषयांवर प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत राज्यातील एकूण 77 कारखान्याच्या 103 प्रतिनिधीनी सहभाग घेतला होता. या सर्वांना प्रमाणपत्र देण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोहर जावळे यांनी केले तर फारुख दुंगे यांनी आभार मानले.