पुणे: जमिनीच्या वादातून तीक्ष्ण शस्त्राने वार करुन वृद्ध शेतकऱ्याचा निर्घृण खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी (दि. १२) खडकवासलानजीकच्या सांगरुण गावात उघडकीस आला. याप्रकरणी उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वृद्ध शेतकऱ्याच्या निर्घृण हत्येने सांगरुण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. नारायण उर्फ नाना पांडुरंग मानकर (वय ७३, रा. लोकेश सोसायटी, बिबवेवाडी) हे खून झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी सतीश विठ्ठल खडके (वय ३५, रा. सांगरुण, ता. हवेली) व त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानकर यांचा मुलगा नीरज (वय ४३) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे.
पोलिसांनी सांगितले की, नारायण मानकर मूळचे खडकवासला परिसरात सांगरुण गावाचे रहिवासी असून आरोपी सतीश खडके याला सांगरुण गावातील जमीन कसण्यासाठी दिली होती. आरोपी खडके शुक्रवारी (दि. ११) सकाळी हा मानकर यांना मोटारीतून घेऊन सांगरुण गावात आला. दिवसभर त्यांनी शेतातील कामे केली. त्यानंतर खडकेने त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. नारायण यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने खडके आणि साथीदारांनी वार केले. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात मानकर यांचा जागीच मृत्यू झाला. मोटारीत नारायण मानकर यांचा मृतदेह ठेवून आरोपी पसार झाले. दरम्यान, शुक्रवारी रात्री उशीरापर्यंत वडील घरी न परतल्याने मानकर यांचा मुलगा नीरज याने गावात विचारपूस केली. त्यानंतर, शनिवारी सकाळी मानकर यांचा मृतदेह मोटारीत आढळल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली.
मानकर यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आले असून त्यांच्या गळ्यातील दोन सोन्याचे गोफ व अंगठी असा सुमारे वीस लाख रुपये किंमतीचा ऐवज घेऊन आरोपी पसार झाले. या घटनेची माहिती मिळाल्यावर परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम, गुन्हे शाखेचे उपायुक्त निखील पिंगळे घटनास्थळी दाखल झाले. तांत्रिक विश्लेषणाच्या साहाय्याने पोलिसांनी तपास जारी केला आहे.