राहुलकुमार अवचट
यवत : दौंड पोलीस स्टेशन, उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) कार्यालय व पोलीस कर्मचारी १०५ निवासस्थानांच्या इमारतींसाठी सुमारे ५६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती दौंड तालुक्याचे आमदार ॲड. राहुल कुल यांनी दिली.
दौंड व यवत पोलीस स्टेशन, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व पोलीस कर्मचारी निवासस्थानांच्या इमारती जीर्ण झाल्या असून, त्या जागी सुस्सज, नवीन इमारती उभारण्यात याव्यात अशी मागणी दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन २०२३ मध्ये देखील लक्षवेधी सूचना उपस्थित करून निधी मिळण्याबाबत मागणी केली होती. त्यावेळी उत्तर देताना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस स्टेशन कार्यालय तसेच पोलीस कर्मचारी वसाहतींसाठी निधी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार दौंड पोलीस स्टेशन येथे कार्यरत पोलीस अंमलदार तसेच पोलीस अधिकाऱ्यांच्या १०५ निवासस्थानांसाठी ४६ कोटी ६६ लाख ८५ हजार रुपये, दौंड पोलीस स्टेशनची प्रशासकीय इमारत ५ कोटी ९६ लक्ष ८८ हजार रुपये तर उपविभागीय पोलीस अधिकारी, दौंड यांच्या प्रशासकीय इमारतीसाठी २ कोटी ८९ लक्ष ५२ हजार रुपये अशा प्रकारे सुमारे ५६ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
या सुसज्ज इमारतीमुळे दौंड शहराच्या वैभवात भर पडणार असून, लवकरच निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती आमदार ॲड. राहुल कुल यांनी दिली. या वेळी दौंड तालुक्याच्या विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले.