पुणे : पुण्यातील कोलाड महामार्गावर पिरंगुट घाटातील उतारावर सिमेंटच्या विटा घेऊन जाणाऱ्या टेम्पो चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असणाऱ्या त्या अवजड टेम्पोने पाच दुचाकी व एका चारचाकी वाहनाला धडक दिली. या अपघातात सात जण जखमी झाले. काहींची प्रकृती गंभीर आहे.
अपघातानंतर मुळशी परिसरातील नागरिक आक्रमक झाले. अपघातग्रस्त ठिकाणाची जिल्हाधिकाऱ्यांनी त्वरित पाहणी करून, उपाययोजना करण्याची जोरदार मागणी त्यांनी केली. दरम्यान, या अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
या अपघातप्रकरणी टेम्पोचालक गोविंद भालचंद्र लाल याच्यावर पौंड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुळशी तालुक्यातील कोलाड-पुणे महामार्गावर पिरंगुट घाटात तीव्र उतार आहे. या उतारावर अनेकदा अपघात होतात. हा भीषण अपघात २० नोव्हेंबर रोजी झाला. मालवाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि त्याने लागोपाठ सहा वाहनांना धडक दिली. या अपघातात प्रवासी आणि पादचारी गंभीर जखमी झाले आहेत, तर काहींची प्रकृती चिंताजनक आहे.
या अपघातातील जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये एका डॉक्टरचा समावेश आहे. अपघातात जबर मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. पुणे येथील खासगी रुग्णालयामध्ये त्यांना उपचारासाठी पाठवले आहे. उर्वरित सहा जखमींना पिरंगुट तसेच लवळे फाटा येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, तीव्र उतारामुळे पिरंगुट घाटात सातत्याने अपघात होतात. परंतु अपघात रोखण्यासाठी स्थानिक प्रशासन कोणत्याच उपाययोजना करत नसल्याने नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. गेल्या आठवड्यात याच ठिकाणी मालवाहू टेम्पोचा ताबा सुटून पाच दुचाकी आणि एका कारचा अपघात झाला.
या अपघातात सहा प्रवासी गंभीर जखमी झाले होते. सातत्याने होणाऱ्या अपघातांच्या मालिकेत अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत, तर शेकडो प्रवासी जायबंदी झाले आहेत. अपघातानंतर मुळशी परिसरातील नागरिक आक्रमक झाले. अपघातग्रस्त ठिकाणाची जिल्हाधिकाऱ्यांनी त्वरित पाहणी करून, उपाययोजना करण्याची जोरदार मागणी त्यांनी केली.