पुणे: पुणे शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी काही शाळा शासनाची आवश्यक मान्यता नसतानाही सर्रासपणे प्रवेश जाहिराती करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने आता कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्ह्यातील १३ शाळा पूर्णतः अनधिकृत असून, २४ शाळा शासन मान्यता प्राप्त असल्या तरी मूळ जागेवर चालू नाहीत. तसेच, ९ शाळांकडे केवळ इरादा पत्र असून अंतिम मान्यता अद्याप प्राप्त झालेली नाही, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.

बहुतांश पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळांमध्ये प्रवेश देण्याकडे कल ठेवतात. मात्र, शाळा अधिकृत आहे की अनधिकृत, याची तपासणी न करता प्रवेश दिला जात असल्याने पालकांची फसवणूक होण्याची शक्यता वाढते. नंतर शिक्षण विभाग अशा शाळांवर कारवाई करत असल्यास विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्याचा थेट परिणाम होतो.
याबाबत जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी संजय नाईकडे म्हणाले, “अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये. अशा शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येऊ शकते.” पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पंचायत समिती व गटशिक्षणाधिकारी यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व अनधिकृत शाळा तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पुढच्या ४८ तासात राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; पुण्यासह कोकणातील अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट
दरम्यान, यापूर्वी जानेवारी महिन्यात १३ अनधिकृत शाळांची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. आता शाळा सुरू होण्याच्या एक दिवस आधी पुन्हा एकदा ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, जानेवारी महिन्यात प्रसिद्ध झालेल्या यादीतील दोन शाळांची नावे पुन्हा एकदा आढळून आली आहेत.
या अनधिकृत शाळांमध्ये एस.पी. इंग्लिश मिडियम स्कूल (वाघोली), कलर स्कूल (ताथवडे), न्यू व्हिजन इंटरनॅशनल स्कूल (पेरणे), किंग्सवे पब्लिक स्कूल (लोहगावळा), माय स्कूल (ताथवडे), न्यू मिलेनियम स्टार इंग्लिश मिडियम स्कूल (बिबवेवाडी), आयडियल पब्लिक स्कूल (धायरी), महात्मा गांधी प्रशाला, टीएमएस तक्का इस्लामिक स्कूल अँड मतब (कोंढवा), सेंट व्ह्यू इंटरनॅशनल स्कूल (कोंढवा), इमॅन्युअल पब्लिक स्कूल (हडपसर), मॅथॉन इंटरनॅशनल स्कूल (सोलापूर रोड) आणि आर्यन वर्ल्ड स्कूल (नहे) यांचा समावेश आहे.







