पुणे : पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांमध्ये इच्छुकांची संख्या आता वाढू लागली आहे. इच्छुकांनी कागदपत्रांची जुळवाजुळव करीत महापालिकेकडे थेट विविध विभागांमधील थकबाकी नसलेले ना-हरकत प्रमाणपत्र घेण्यास सुरुवात केली आहे. १९ इच्छुकांनी महापालिकेची एनओसी घेतली आहे, तर ४५ इच्छुकांनी एनओसीसाठी अर्ज दाखल केले आहेत.
राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. इच्छुकांना दि. २२ ते २९ ऑक्टोबरदरम्यान अर्ज भरता येणार आहेत. कोणत्याही उमेदवाराला निवडणूक लढवण्यासाठी कोणत्याही करांची थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र उमेदवारी अर्जासोबत जोडणे बंधनकारक असते. थकबाकीदार असलेल्या उमेदवारांच्या अर्जावर कुणी आक्षेप घेतल्यास आणि त्यात तो थकबाकीदार असल्याचे आढळून आल्यास त्या उमेदवाराचा अर्ज बाद ठरविला जातो. त्यामुळे पुणे महापालिकेच्या विविध विभागांचे थकबाकी नसलेले ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळण्यासाठी ४५ इच्छुकांनी अर्ज केला आहे. त्यापैकी १९ इच्छुकांना पालिकेने एनओसी दिली आहे.
त्यामध्ये माधुरी मिसाळ, धीरज घाटे, सचिन तावरे, दीप्ती चवधरी, दिलीप वेडे-पाटील, अमोल बालवडकर, प्रसन्न जगताप, संजय शिंदे, चंद्रकांत मोकाटे, अश्विनी कदम, सिद्धार्थ शिरोळे, श्रीनाथ भिमाले, पृथ्वीराज सुतार, प्रशांत जगताप, रमेश बागवे यांना एनओसी दिली आहे. एनओसीसाठी अर्ज दाखल झाल्यानंतर संबंधिताकडे थकबाकी असली, तरी त्यांच्याकडून थकबाकी भरून घेतली जात आहे. पालिकेची थकबाकी असेल, तर ती भरण्यासाठीही इच्छुकांच्या समर्थकांची धावधाव आता पालिकेत दिसू लागली आहे.