पुणे : गेल्या दोन वर्षांत परिवहन विभागाच्या ४५ फेसलेस सेवा सुरु केल्या असून, राज्य शासनाने मेटासोबत व्हॉट्सअप गर्व्हनन्ससाठी करार केला आहे. यामुळे विविध विभागांच्या ५०० अधिसूचित सेवा व्हॉट्सॲपच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. आता यामध्ये परिवहन विभागाच्या ४५ सेवांचादेखील समावेश करण्याचा प्रयत्न करणार आहोत, अशी माहिती परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील वरळी येथे नुकतेच परिवहन आयुक्त कार्यालय ‘परिवहन भवन’ इमारतीचे भूमिपूजन केले. तसेच धर्मवीर आनंद दिघे ऑटो रिक्षा व मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळांतर्गत सन्मान निधी वितरण आणि परिवहन विभागातर्फे नागरिकांसाठी दिल्या जाणाऱ्या फेसलेस सुविधांचे लोकार्पणही फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले आहे. याबाबत माहिती देताना राज्यमंत्री मिसाळ यांनी सांगितले की, परिवहन विभाग संर्वात जास्त महसूल देण्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. परिवहन विभाग थेट नागरिकांशी आणि अन्य विभागांशी समन्वय करावा लागतो. यामुळे या विभागाचे काम कौतुकास्पद आहे. आपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी खासगी वाहन चालकांशी आणि संस्थाशी समन्वय साधण्यात येणार आहे.