पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्याकडे राज्य सरकारने लक्ष न दिल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा एसटी कर्मचाऱ्यांकडून देण्यात आला आहे. त्यांच्या मागण्याकडे शासनाने वेळीच लक्ष न दिल्यास ऐन होळीच्या तोंडावर एसटी संप होण्याची शक्यता असून प्रवाशांचा प्रवास रखडणार आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या मुख्य मागण्या..
1. 53 टक्के महागाई भत्ता त्वरित लागू करावा
2. 2016 ते 2021 पर्यंतच्या घरभाडे भत्त्याची आणि वार्षिक वेतन वाढीची थकबाकी अदा करावी
3..जाचक शिस्त आणि आवेदन प्रक्रिया रद्द करावी
4. आरटीओ विभागाकडून चालकांवर होणारी अन्यायकारक दंडात्मक कारवाई थांबवावी
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या पूर्ण होत नसल्यामुळे एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी राज्यभरात एसटी आगार विभागाच्या मुख्य ठिकाणी आंदोलन केलं. या आंदोलनाची दखल राज्य सरकारने न घेतल्यास राज्यभरात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने दिला आहे.
दरम्यान ऐन होळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांच्या या निर्णयामुळे आता एसटी वाहतुकीवर मोठा परिणाम होणार आहे . त्याचबरोबर या आंदोलनामुळे प्रवाशांचे मोठे हाल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची दखल घ्यावी अशी मागणी होत आहे.