पुणे : पुण्यात गेल्या काही दिवसापासून कोयता गँगचा, वाहनांची तोडफोड, जबरी चोऱ्या, घरफोड्या करणाऱ्या आरोपींनी जोरदार धुमाकूळ घातला आहे. शहरातील कोंढवा, वानवडी, मुंढवा, हडपसर, लोणी काळभोरसह उपनगरांमध्ये गुन्हेगारांचे वर्चस्व वाढले आहे. यामध्ये सर्वाधिक मोठे कार्यक्षेत्र आणि गुन्हेगारी घटनांचा भाग म्हणून परिमंडळ पाचकडे पाहिले जाते.
यामुळे या परिमंडळातील ७ पोलीस ठाण्यातील ४२ सराईत गुन्हेगारांवर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई करत पुणे, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. यामध्ये चार टोळी प्रमुखांचा समावेश आहे.
पुणे शहरातील पोलीस ठाण्याची ५ झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. परिमंडळ पाचमधील कोंढवा, मुंढवा, हडपसर, बिबवेवाडी, मार्केटयार्ड, वानवडी आणि लोणी काळभोर या भागात गुन्हेगारांचा उपद्रव वाढला आहे. शहरात काही महिन्यांपूर्वी कोयता गँगचा विषय राज्यभर गाजला. या कारवाईची सुरुवात ही हडपसरमधून झाली होती.
दरम्यान, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालयांतील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कायद्याचा वचक राहावा, यासाठी संबंधित पोलिस ठाण्यांकडून तडीपारीचे प्रस्ताव पाठविण्यात आले होते.
त्यानुसार परिमंडळ पाचमधील हडपसर विभाग व वानवडी विभागांचे अधिपत्याखाली येणाऱ्या वेगवेगळयां पोलीस स्टेशन कडील सराईत गुन्हेगारांच्या अभिलेखाचा अभ्यांस करण्यात आला. त्यावरून परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त आर. राजा, सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख, गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शाखाली ४२ सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे.