दौंड, (पुणे) : हिंगणीबेर्डी (ता. दौंड) हद्दीतील उजणी धरणाच्या बॅक वॉटर क्षेत्रातील शासकीय मातीचे अज्ञात व्यक्तींनी बेकायदेशीर उत्खनन करुन 40 ब्रास माती चोरुन नेल्याचा प्रकार समोर आला. रविवारी (ता. १०) रात्रीच्या वेळेस ही घटना उघडकीस आली.
याप्रकरणी देवुळगाव राजे येथील मंडल अधिकारी दादासाहेब संभाजी लोणकर, (वय- 51, रा. दत्त नगर गोपाळवाडी, ता. दौंड) यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दादासाहेब लोणकर मंडल अधिकारी या पदावर नेमणुकीस आहेत. सोमवारी (ता. ११) साडेबारा वाजण्याच्या सुमारास हिंगणीबेर्डी गावचे पोलीस पाटील यांनी फोन करुन सांगितले की, हिंगणीबेर्डी येथील उजणी धरणाच्या बँक वाँटर क्षेत्रातुन शासकीय मातीचे अवैधरित्या उत्खनन करुन माती चोरुन नेली.
सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता मागील चार दिवसात 20 गुंठे क्षेत्रातुन 9 हजार 400 रुपयांची 40 ब्रास माती अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याचे दिसून आले. याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात लोणकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक संतोष शिंदे करत आहेत.