यवत, (पुणे) : गावी जाऊन येतो, असे सांगत घरातून बाहेर पडलेल्या दहिटणे (ता. दौंड) येथील एका ३८ वर्षीय तरुणाचा नदीपात्रात पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात खबर देण्यात आली आहे. योगेश काळूराम कोळपे (वय-३८, रा. दहीटणे, ता. दौंड) असे नदीपात्रात पडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे वडील काळूराम तुकाराम कोळपे यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
यवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (ता. ०१) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास शेजारी राहणाऱ्या दोन मुली या योगेश काका हा दहिटणे पुलावरून नदीत पडला असल्याचे सांगत आल्या होत्या. सदर घटनेची खातरजमा करण्यासाठी फिर्यादींचा लहान मुलगा सुरेश कोळपे व नातेवाईक सदर ठिकाणी गेले.
यावेळी त्याठीकाणी नागरिकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. यावेळी योगेश कोळपे याचा होडीच्या व बटरीच्या सहाय्याने शोध घेण्यास सुरुवात केली. रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास दहिटणे पुलाजवळ तो पाण्यात बुडालेल्या अवस्थेत आढळून आला. त्याला तात्काळ जमलेल्या नागरिकांच्या मदतीने पाण्यातून बाहेत काढले व खाजगी वाहनाने यवत येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी तपासून योगेश याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले. दरम्यान, याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात खबर देण्यात आली असून तपास पोलीस करीत आहेत.