पुणे : कॅमेरा बनवण्यासाठी लागणाऱ्या मशिन खरेदीचा व्यवसाय सुरु करु. या व्यवसायातून बक्कळ नफा मिळेल, असे आमिष दाखवन, नफा वाटून घेऊ, असे सांगून एका व्यक्तीची ३३ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी नागपूर येथील एका व्यक्तीवर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. खराडे येथील पठारे वस्ती येथे हा प्रकार २०२२ ते ११ जुलै २०२३ या कालावधीत घडला.
याबाबत मोहम्मद आसीम जियाउद्दीन शेख (वय-२८, रा. पठारे वस्ती, ठुबे, खराडी, पुणे) यांनी सोमवारी (ता. ५) चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन रजत ईश्वर गोलार (रा. नागपूर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. रजत गोलार याने फिर्य़ादी यांचा विश्वास संपादन केला.
दरम्यान, फिर्यादी यांना कॅमेरा बनविणारी मशी खरेदीचा व्यवसाय करुन त्यातून मिळणारा नफा वाटून घेण्याचे आमिष दाखवले. त्याने फिर्यादी यांच्याकडून ६४ लाख ८८ हजार ९४९ रुपये घेतले. मात्र, आरोपीने मशिन खरेदी केले नाही. त्यामुळे फिर्य़ादी यांनी आरोपीकडे पैशांची मागणी केली. त्यावेळी त्याने ३६ लाख ७९ हजार ४४५ रुपये परत केले. यानंतर शेख यांनी उर्वरित पैशांची मागणी आरोपीकडे केली.
त्यावेळी आरोपीने पैसे देण्यास टाळाटाळ करुन शेख यांची फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शेख यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला होता. या तक्रार अर्जाची चौकशी करुन चंदननगर पोलिसांनी आरोपी रजत गोलार याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.