उरुळी कांचन, (पुणे) : पूर्व हवेलीतील कोरेगाव मूळ-बिवरी येथील मुळा-मुठा नदीवरील जुना कोल्हापूर पद्धतीचा बंधारा लहान असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने नवीन मोठा पूल बांधण्यासाठी ३० कोटी रुपये निधी देण्यात यावा, या मागणीचे निवेदन कोरेगाव मुळचे सरपंच मंगेश कानकाटे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बी. एन. बहिर यांना दिले आहे.
सरपंचांनी दिलेल्या निवेदनानुसार, कोरेगाव मूळ – बिवरी येथील मुळा-मुठा नदीवरील जुना कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पावसाळ्यात नदीला पूरस्थिती निर्माण झाल्यावर पूल ६ ते ८ दिवस पाण्याखाली जातो. हा पूल लहान असल्यामुळे शाळेतील मुलांना जाण्या-येण्यासाठी खूप त्रास होतो. तसेच या बंधाऱ्यावरून जाणारे शेतकरी व नागरिक यांना अडचण होते.
पूर्व हवेलीतील बिवरी, शिरसवडी, अष्टापुर येथील रहिवाशांना उरुळी कांचन येथे येण्यासाठी भवरापूर येथील पुलाचा वापर करावा लागतो. त्यामुळे सुमारे १० ते १२ किलोमीटरच्या अंतराचा वळसा घालावा लागतो. या ठिकाणी मोठा पूल बांधणे अत्यंत आवश्यक आहे. तरी या ठिकाणी पूल बांधण्यासाठी ३० कोटी निधी मिळावा असे निवेदनात म्हटले आहे.
दळणवळणाचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागेल
याबाबत बोलताना सरपंच मंगेश कानकाटे म्हणाले, “गेल्या अनेक दिवसांपासून बिवरी-कोरेगाव मूळ येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याजवळील नदीपात्रात प्रचंड प्रमाणात जलपर्णी व झाडे झुडपे वाढल्याने व मुळातच ताकद कमी झालेल्या बंधाऱ्याचे चालू झालेल्या पावसाळ्यात नक्कीच मोठे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. पर्यायी पूल झाल्यानंतर बिवरी, वाडेबोल्हाई, अष्टापूर, शिरसावाडी, डोंगरगाव या सर्व गावांतील नागरिकांचा पावसाळ्यात होणाऱ्या
दळणवळणाचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागेल.”