उरुळी कांचन, (पुणे) : जोराचा वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह अचानक आलेल्या पावसामुळे शेतात काम करण्यास गेलेल्या महिला अडोशाला थांबल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या बाजुलाच विज पडल्याचा मोठा आवाज झाल्याने तीन महिला घाबरून गेल्या. घाबरलेल्या तीन महिलांपैकी एका 65 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर दोघीजण किरकोळ जखमी झाल्या आहेत. शुक्रवारी (ता. 17) सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास खामगाव टेक (ता. हवेली) शिवारात ही घटना घडली आहे.
अंजना बबन शिंदे (वय – 65, रा. शिंदवणे, ता. हवेली) असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. तर सुनीता महादेव डोंगरे (वय- 56), व संध्या गाडेकर (वय – 45, रा. दोघीही, पांढरस्थळ, उरुळी कांचन, शिंदवणे रोड, ता. हवेली) अशी किरकोळ जखमी झालेल्या दोघींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अंजना शिंदे व त्यांच्या बरोबर उरुळी कांचन व शिंदवणे परिसरातील ११ महिला या शेतातील कामानिमित्त खामगाव टेक या ठिकाणी शेतातील कामे करण्यासाठी गेल्या होत्या. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास काम संपवून घरी निघाल्या असतानाच अचानक विजेच्या कडकडाटासह जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाल्याने सर्वजण एका आडोशाला थांबल्या.
त्यावेळी त्यांच्या काही अंतरावर असलेल्या ठिकाणी वीज कडाडली. या विजेच्या मोठ्या आवाजाने तीन महिला जागेवरच बेशुद्ध पडल्या. त्यांना खाजगी वाहनातून उरुळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य या ठिकाणी दाखल करण्यात आले. त्यांना खाजगी वाहनातून उरुळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य या ठिकाणी दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासल्यानंतर अंजना शिंदे यांना पुढील उपचारासाठी उरुळी कांचन येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर जखमी असलेल्या सुनीता डोंगरे व संध्या गाडेकर यांच्यावर उपचार करून सोडून देण्यात आले.
दरम्यान, उपचारादरम्यान अंजना शिंदे यांचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. शिंदे यांच्या पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. या घटनेने शिंदवणेसह परिसरातील गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.