पिंपरी : आळंदी घाटाजवळ सराईत गुन्हेगारांना सापळा रचून अटक करण्यात पिंपरी-चिंचवडच्या दरोडा विरोधी पथकाला यश आले आहे. सराईत गुन्हेगारांकडून ३ गावठी पिस्तुले आणि ४ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. वीरभद्र रघुनाथ देवज्ञ, राहुल बसवराज सर्जन आणि अमोल फिलिप साळवे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, पोलीस शिपाई सुमित देवकर आणि गणेश सावंत यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की, वीरभद्र हा सराईत गुन्हेगार आळंदी घाटाजवळ आला असून, त्याने पिस्तुल बाळगले आहे. दरम्यान, याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ त्याठिकाणी जाऊन, सापळा रचून वीरभद्र देवज्ञ याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील एक गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. या गुन्ह्याचा अधिक तपास केल्यानंतर राहुल बसवराज सर्जन आणि अमोल फिलिप साळवे यांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी गुन्हेगारांकडे अधिक चौकशी केल्यानंतर साळवे याच्याकडे दोन गावठी पिस्तुले आणि दोन जिवंत काडतुसे आढळली. एकूण तीन गावठी पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे दरोडा विरोधी पथकाने जप्त केली आहेत.
या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी हे करत आहेत. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.