पुणे : पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला चाप बसवण्यासाठी पुणे पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. नवीन आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यावर पुण्यातील २६७ गुन्हेगारांना पोलीस आयुक्तालयामध्ये बोलावत ओळख परेड घेण्यात आली. यामध्ये पुण्यातील प्रसिद्ध टोळ्यांचे म्होरकेसुद्धा हजर होते, यामध्ये गजा मारणे, बाबा बोडके, निलेश घायवळ, आंदेकर यांच्यासह कुख्यात गुन्हेगारांची परेड पुणे पोलिसांनी काढली. पुणे पोलीस आयुक्तालयातच या गँगचे प्रमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पुणे पोलिसांनी शेवटची वॉर्निंग दिली.
पोलिसांनी सर्व गुन्हेगारांची ओळख परेड करत त्यांना तंबी दिली. सोशल मीडियाचा वापर करत दहशत पसरवू नये. त्यासोबतच हातात कोयते घेत रील्स बनवून ती शेअर करू नका, अशा सूचना पोलिसांनी सर्वांना दिल्या. तसेच पोलीस समजवत असतानाच टिप्याच्या गँगमधील एकाने मिशांना पिळ दिला, हे पाहिल्यानंतर पोलीस संतापले आणि त्याला पुढे बोलावलं. तसंच काय करत होता? असा प्रश्न आवाज चढवून विचारला तेव्हा तो घाबरलेला दिसला.
शेवटी त्याने कबुल केलं की आपण मिशा पिळल्याचं हाताने करून दाखवलं. पोलिसांनी त्यावेळी त्याला समज दिली आणि सोडून दिलं. संबंधित गुन्हेगार हा मीडियाचा कॅमेरा समोर आल्यावर मिशा पिळत होता. पोलिसांच्या नजरेपासून तो वाचू शकला नाही. सोशल मीडियावर सध्या तुफान व्हिडीओ व्हायरल होत आहे.