-बापू मुळीक
सासवड : दिवंगत लोकनेते चंदूकाका जगताप यांच्या संकल्पनेतून पुरंदरमधील शेतक-यांसाठी उभ्या राहिलेल्या 3 हजार 648 हजार सभासदांच्या मालकीचा पुरंदर मिल्क अँड अॅग्रो प्रो. लि. खळद या संस्थेमुळे पुरंदर आणि परिसरातील शेतकऱ्यांना दुधाचे दर चांगले मिळत आहेत. अनेक दुध उत्पादक संस्था येऊन गेल्या, मात्र गेली 24 वर्षे अखंडपणे दुध संकलन करणारी पुरंदर मिल्क ही एकमेव संस्था असल्याचे संस्थेचे संस्थापक आमदार संजय जगताप यांनी सांगितले.
सोमवारी (दि.16 ) संस्थेच्या खळद – गोटेमाळ येथील कोल्ड स्टोअरेजमधे संस्थेची 24 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या जेष्ठ संचालिका आनंदीकाकी जगताप यांच्या अध्यक्षतेखाली तसेच संस्थेच्या अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालिका राजवर्धिनी जगताप यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
यावेळी सभासदांना 1 किलो तूप वाटपाचा (22 लाख रूपये ) शुभारंभ आमदार संजय जगताप, आनंदीकाकी जगताप, राजवर्धिनी जगताप, संत सोपानकाका सहकारी बँकेचे अध्यक्ष रमणिकलाल कोठडिया व पुरंदर मिल्कच्या संचालक मंडळाच्या उपस्थितीत संपन्न झाला. दररोज 35 हजार लिटर दूध संकलन होत आहे. यावेळी 5 हजार 800 मेट्रीक टन क्षमतेच्या इग्लू कोल्ड स्टोअरेजचे 3 हजार मॅट्रिक टन क्षमतेचे विस्तारीकरण, कोल्ड स्टोअरेजला सौर ऊर्जेचा आधार देणे, बांधकाम व्यवसायात उतरणे याप्रमाणे संस्थेच्या वाढीबरोबरच दुध उत्पादकांच्या फायद्यासाठी संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धिनी जगताप व संचालक मंडळाने अनेक निर्णय घेतले आहे. पुढील काळात शेतकऱ्यांसाठी शेतीपुरक व्यवसायांबाबत विविध प्रकल्प सुरू करणार असल्याचे आमदार संजय जगताप यांनी सांगितले.
संस्थेला यंदा दुध व दुग्धजन्य पदार्थ विक्री, संस्थेचा पेट्रोल पंप, वजन काटा, आनंदी फ्रोजन ट्रिट आणि कोल्ड स्टोरेज मधून 59 कोटी 53 लाख 72 हजार रुपयांचा व्यवसाय झाला आहे. दहा हजारांहून अधिक गवळी, 70 दुध संकलन केंद्रातून यावर्षी जवळपास 10 कोटी 60 लाख 68 हजार लिटर दुध संकलन केले. एकही दिवस संकलन बंद ठेवले नाही. संस्थेचे स्व भांडवल 25 कोटी, भागभांडवल 5 कोटी 10 लाख, मालमत्ता 100 कोटींची असून 10 लाख 8 हजार रुपयांचा कर पुर्व नफा तर 5 लाख 20 हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. 4 कोटी 8 लाख 75 हजार रुपयांच्या दुग्धजन्य पदार्थांची विक्री झाली आहे. चंदूकाका जगताप घालून दिलेल्या आर्थिक शिस्तीप्रमाणे कामकाज सुरु असल्याचे आमदार संजय जगताप यांनी सांगितले.
दरवर्षीप्रमाणे भागधारकांना 1 किलो प्रमाणे यंदाही तूप वाटप करण्यात आले. दि 16 सप्टेंबर पासून 31 ऑक्टोंबर पर्यंत संस्थेच्या खळद येथील कार्यलयातून हे वाटप होणार आहे. यासाठी आधारकार्ड आवश्यक असल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले.
संस्थेच्या इग्लू कोल्ड स्टोअरजेजची क्षमता 5 हजार 800 मॅट्रिक टन असून यामध्ये विविध फळे, फुले, धान्य, पल्प आदी प्रक्रिया केलेले पदार्थ ( – 22 ते + 8 अंश सेल्सिअस) नियंत्रित तापमानात साठवून ठेवता येतात. यामुळे पुरंदरसह परिसरातील शेतकऱ्यांना फायदा होत असल्याचे सीईओ राजेंद्र मांढरे यांनी सांगितले.
यावेळी सुनीता कोलते, महादेव टिळेकर, अशोक निगडे, हाजी शहाजान शेख, कृष्णा देवकर, महेश खैरे, प्रकाश पवार, संभाजी काळाणे, महेश राणे, हरीभाऊ फुले, काका कामथे, पुरंदर मिल्कचे संचालक प्रदीप पोमण, आप्पासाहेब पुरंदरे, पै. मोहन जगताप, पै. पांडुरंग कामथे, विठ्ठल मोकाशी, शशिकांत दाते, अविनाश वाघोले, संजय ताकवले, शंकर कड, त्रिंबक माळवदकर, विलास जगताप, साजिद बागवान, बाळासो बहिरट उपस्थित होते. प्रतिनिधी शरद कामथे, रणजित जगताप, चंद्रशेखर जगताप, तुषार खळदकर, विनायक चाळेकर, वर्षा तावरे आदींनी नियोजन केले. जेष्ठ संचालक प्रदीप पोमण यांनी प्रास्ताविक, प्राचार्य नंदकुमार सागर आणि पुरंदर नागरीचे सरव्यवस्थापक अनिल उरवणे यांनी सुत्रसंचलन, व्यवस्थापक संतोष जगताप यांनी अहवाल वाचन केले तर विठ्ठल मोकाशी यांनी आभार मानले.
सौर ऊर्जेचा आधार…
वाढते विजबिल त्यामुळे कमी होणारा नफा, यावर आणि कायमस्वरूपी ठोस तोडगा म्हणून पुरंदर मिल्क अॅण्ड अॅग्रो प्रोडक्ट्स लि., खळद या संस्थेने डेअरी प्लॅंट, कोल्ड स्टोअरेज आणि पेट्रोल पंप या विभागांना सौर ऊर्जेचा आधार देण्यात येणार आहे. यासाठी 600 किलो प्व्हॅट रूप टॉप सोलर प्लँटची उभारणी करण्यात आली असून यामुळे विजबीलात दरवर्षी 50 ते 52 लाख रुपयांची बचत होणार असल्याची माहिती पुरंदर मिल्कचे संचालक पुरंदर – हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी दिली. त्यानुसार डेअरी प्लॅंट, कोल्ड स्टोअरेज आणि पेट्रोल पंप यासाठी 3 कोटी 60 लाख रुपये खर्चाच्या 600 किलो व्हॅट रूप टॉप सोलर प्लँटची उभारणी करण्यात येणार आहे. यामध्ये ईग्लू कोल्ड स्टोअरेज साठी 350 किलोव्हॅट, डेअरी प्लँन्टसाठी 200 किलोव्हॅट आणि पेट्रोल पंपासाठी 50 किलोव्हॅट प्रकल्प उभारण्यात आला आहे. 1 नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे.
बांधकाम व्यावसायात उतरणार…
पुरंदर मिल्क अॅण्ड अॅग्रो प्रोडक्ट्स लि खळद या संस्थेची सासवड येथे सासवड – हडपसर रस्त्यालगतच 70 गुंठे जागा आहे. यामध्ये गृहनिर्माण प्रकल्प उभारून सदनिका तयार केल्यास 2 लाख चौरस फूट बांधकाम करता येईल व यातून संस्थेला 50 कोटींचे भांडवल उभे राहिल. त्यामुळे पेट्रोल पंप, वजन काटा, कोल्ड स्टोअरेज, प्रक्रिया उद्योग या प्रमाणे बांधकाम या नवीन व्यवसायात संस्थेने उतरावे, असे मत आमदार संजय जगताप यांनी मांडले. त्यावर सभासदांनी होकार देत बांधकाम व्यवसायात उतरण्याबाबत संमती दिली.