राजगुरुनगर : लोणावळ्यातील लायन्स पॉईंटच्या एका कड्यावरून दीडशे ते दोनशे मीटर खोल दरीत कोसळलेल्या २१ वर्षीय युवतीचा मृतदेह बाहेर काढण्यात लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्रच्या बचाव पथकाला यश आले आहे.
साक्षी रमेश होरे (रा. म्हासाडे कान्हूरकर वस्ती, दावडी, खेड, पुणे) असे या मुलीचे नाव असून, ती इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्गात शिकत होती. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, साक्षी हिचे चुलते विकास किसन होरे (रा. गव्हाणे वस्ती, भोसरी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
साक्षी ही आकुर्डी येथील डी. वाय. पाटील महाविद्यालयात शिकत होती. बुधवारी (ता. २१) ती एकटीच लोणावळ्यातील लायन्स पॉईंट येथे फिरायला आली होती. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ती लायन्स पॉईंटच्या एका कड्यावरून दीडशे ते दोनशे मीटर खोल दरीमध्ये पडली. त्याठिकाणी कड्याच्या वर एका ठिकाणी एक बॅग आणि चप्पल आढळून आल्याने तेथील एका व्यावसायिकाने लोणावळा ग्रामीण पोलिसांना ही माहिती कळवली.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत शिवदूर्ग मित्र या बचाव पथकाला देखील त्याठिकाणी पाचारण केले. मात्र, जास्त रात्र झाल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर शोध मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
गुरुवारी (ता. २२) सकाळी सहा वाजता शिवदूर्ग बचाव पथक लायन्स पॉईंट या घटनास्थळी दाखल झाले. लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शेवते, विजय गाले, सीताराम बोकड, सचिन शेलार हे देखील लायन्स पॉईंट या ठिकाणी पोचले होते. रेस्क्यू पथकातील काही तरुण रोपच्या सहाय्याने दरीमध्ये उतरले. शोध घेतला असता दगडांमध्ये पडलेला साक्षी हिचा मृतदेह मिळून आला. त्यानंतर मृतदेह दोरीच्या साहाय्याने दरीमधून वर काढण्यात आला.