पुणे : जमीन देण्याचे आश्वासन देऊन एकाची तब्बल २१ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार चंदननगर-खराडी परिसरात उघडकीला आला आहे. फेब्रुवारी २०२३ ते ४ जानेवारी २०२४ दरम्यान खराडी येथील खराडकर पार्क येथे हा प्रकार घडला. या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी एकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत तुकाराम मल्हारी नरवडे (वय-४७, रा. खराडकर पार्क, खराडी) यांनी गुरुवारी (ता. ४) चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गणेश नारायण कवडे (रा. लक्ष्मी नारायण निवास, कवडे मळा, घोरपडी गाव) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश कवडे याने फिर्यादी व त्यांचे भागीदार सुशिलकुमार शिंदे यांना पुरंदर तालुक्यातील सोनेरी येथील गट क्रमांक ६६० मधील ४१ गुंठे जमीन विकायची असल्याचे सांगितले. तसेच ही जमीन विकत देतो, असे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केला.
दरम्यान, आरोपीने जमीन देण्यासाठी फिर्यादी व त्यांच्या भागीदारांकडून रोख व चेकद्वारे २९ लाख रुपये घेतले. मात्र, जमीन दिली नाही. त्यामुळे फिर्यादींनी आरोपीकडे पैशांची मागणी केली. त्यावेळी आरोपीने ८ लाख रुपये परत करुन उर्वरित २१ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली.