पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी काँग्रेसने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून काँग्रेसकडून २० इच्छुकांनी अर्ज सादर केले आहेत. यामध्ये आजी-माजी आमदार, माजी नगरसेवक, पक्षाचे माजी शहराध्यक्ष पदाधिकारीसह अनेकांंनी पक्षाकडे अर्ज सादर केले आहेत. शहर काँग्रेसकडून ७ ते ९ जानेवारी या कालावधीत पक्षाकडून निवडणूक लढविण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते.
त्यात शहराध्यक्ष अरविंद शिंदे, आमदार रविंद्र धंगेकर, माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, मोहन जोशी, दिप्ती चवधरी, अनंत गाडगीळ, अॅड. अभय छाजेड, प्रवक्ते गोपाळ तिवारी, संजय बालगुडे, संगीता तिवारी, माजी नगरसेवक आबा बागूल, विरेंद्र किराड, दत्ता बहिरट, नरेंद्र व्यवहारे, यशराज पारखी, मुकेश धिवार, राजू कांबळे, मनोज पवार, दिग्विजय जेधे आणि आर. जे संग्राम खोपडे या २० जणांनी अर्ज सादर केले आहेत.
पुढील दोन महिन्यांत आगामी लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकिय पक्षांनी निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडीमध्ये पुणे लोकसभा मतदारसंघ हा कॉंग्रेसकडे असल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर शहर कॉंग्रेसने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्याची प्रक्रिया पार पाडली. ही यादी प्रदेश कार्यकारीणीस पाठविली जाणार आहे. त्यानंतर ही यादी केंद्रीय कार्यकारिणीस पाठविली जाणार आहे.