उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत घराचा दरवाजा तोडून ५० हजार रोख रक्कम, सोन्या- चांदीचे दागिने असा २ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे. उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील लक्ष्मीनगर, बायफ रोड, उरुळी कांचन येथे मध्यरात्री ही घटना घडली आहे. स्वप्नील बाळासाहेब कांचन (वय- ३०, रा. लक्ष्मीनगर, बायफ रोड, उरुळी कांचन, ता. हवेली) यांच्या घरी ही चोरी झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्नील कांचन हे काही कामानिमित्त बाहेर गेले होते. यावेळी घरामध्ये असलेल्या त्यांची आई एका खोलीला कुलूप लावून दुसऱ्या खोलीत झोपली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरातील रोख रक्कम व सोन्या- चांदीचे दागिने घेऊन पळ काढला. दरम्यान, सदर ठिकाणी उरुळी कांचनचे पोलीस दाखल झाले असून घटनेची चौकशी करून पंचनामा सुरु करण्यात आला आहे.