उरुळी कांचन (पुणे) : दौंड तालुक्यातील निसर्गसौंदर्याने नटलेल्या डाळींब बन (ता. दौंड) तीर्थक्षेत्र येथील श्री विठ्ठल देवस्थानासाठी भक्तनिवास बांधण्यासाठी ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत तब्बल २ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. अशी माहिती डाळिंबचे सरपंच बजरंग म्हस्के यांनी दिली. तसेच मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्याधिकारी व मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे व थेऊरचे ग्रामपंचायत सदस्य पै. युवराज काकडे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.
प्रतिपंढरपूर म्हणून गणल्या जाणाऱ्या डाळींब बन विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावेळी या ठिकाणी जत्रेचे स्वरूप प्राप्त होते. आषाढी एकादशीला पहाटे महापूजा झाल्यानंतर दिवसभर हवेली, दौंड, पुरंदरसह परिसरातील दोन ते अडीच लाख भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे या ठिकाणी प्रचंड गर्दी होते. त्यामुळे या ठिकाणी भाविकांना सेवा व सुविधा पुरविण्यासाठी तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी दर्शन मंडप हॉल, डायनिंग हॉल, भक्तनिवास बांधण्याची आवशक्यता होती. या विविध विकासकामांसाठी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व आमदार राहुल कुल यांच्याकडे डाळिंब ग्रामपंचायत व श्री क्षेत्र विठ्ठल देवस्थान ट्रस्ट यांच्याकडून वारंवार पाठपुरावा सुरु होता.
दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्याधिकारी व मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे व थेऊरचे ग्रामपंचायत सदस्य पै. युवराज काकडे यांनी या मागणीची तत्काळ दखल घेऊन देवस्थानला भक्तनिवास बांधण्यासाठी तब्बल २ कोटींचा निधी मंजूर केला आहे. या मंजुरीचे पत्रही डाळिंबचे सरपंच बजरंग म्हस्के यांना नुकतेच दिले आहे. ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी हा निधी देण्यात आला आहे.
दरम्यान, डाळींब बन देवस्थानला शासनाचा ‘ब’ तीर्थक्षेत्र दर्जा मिळाला असून, परिसरातील अनेक विकासकामे मार्गी लावली आहेत. त्यातच आणखी दोन कोटींचा निधी प्राप्त झाल्याने ग्रामस्थ व भाविकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. मंदिर परिसरात स्वच्छता गृह, पाण्याची टाकी, गावातील पालखी प्रदक्षिणा मार्गाचे काँक्रिटीकरण, भक्त भवन, परिसर संरक्षक भिंत आदी विविध विकासकामे सुरु आहेत व काही करण्यात येणार आहेत.
याबाबत बोलताना डाळिंबचे सरपंच बजरंग म्हस्के म्हणाले, “२०१९ साली भक्तनिवास बांधण्यासाठी ग्रामपंचायत व ट्रस्ट यांच्याकडून प्रस्ताव देण्यात आला होता. परंतु, पाठपुराव्याअभावी हा प्रस्ताव धूळ खात पडला होता. माझी सरपंचपदी निवड झाल्यानंतर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन याच्याकडे सदरचा पाठपुरावा केला. यावेळी या कार्यात थेऊरचे ग्रामपंचायत सदस्य युवराज काकडे यांनी मदत केली. तसेच विशेष कार्याधिकारी मुख्यमंत्री कार्यालय व मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी मंजुरीचे पत्र दिले. त्याबद्दल मी दोघांचेही आभार मानतो. यावेळी २ कोटींचा निधी देण्यात आला आहे. उर्वरित पुढील ३ कोटी निधी लवकरच देऊ अशी ग्वाही दिली.