शिक्रापूर: रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथील एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया प्रा. लिमिटेड कंपनीतील तब्बल १८ टीव्ही चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली. कंपनीतील तात्पुरता कामगार चोरी करताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. याबाबत कंपनीचे टीम हेड लॉजिस्टिक उमेश कुमार पांडे (वय ५२, रा. विजय विहार, वाघोली, ता. हवेली, जि. पुणे) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी अजय भीमराव जाधव (रा. जमशेदपूर, ता. पुसद, जि. यवतमाळ) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कंपनीतील वेगवेगळ्या तीन बिल्डींगमधून फ्रीज, टीव्ही, एसी तसेच वॉशिंग मशिन बनवले जातात. कंपनीमधील शिल्लक मालाचा साठा १ ऑक्टोबर रोजी तपासत असताना त्यांना कंपनीतील ४३ इंची १७ टीव्ही नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पुन्हा १३ ऑक्टोबर रोजी शिल्लक मालाचा साठा तपासला असता ६५ इंची एक टीव्ही कमी असल्याचे निदर्शनास आल्याने कंपनी व्यवस्थापकांनी कंपनीतील सीसीटीव्ही तपासले. यात एक कामगार ६५ इंची टीव्हीचा बॉक्स बाहेर घेऊन जाताना सीसीटीव्हीमध्ये दिसून आला.
चौकशी केली असता सदर कामगार हा ए बिल्डिंगमधील फ्रीज तयार होणाऱ्या ठिकाणी ठेकेदारीतून तात्पुरता कामगार असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्या कामगाराबाबत चौकशी केली असता सदर कामगार दहा दिवसांपासून कामावर नसल्याचे दिसून आले. पुढील तपास पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अशोक चव्हाण हे करत आहेत.