उरुळी कांचन, (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावरील कोरेगाव मूळ चौकातून प्रयागधाम ग्रामपंचायतीकडे वळणाऱ्या टेम्पोला लोणी काळभोर येथील एका १७ वर्षीय अल्पयीन दुचाकी चालकाने धडक दिली. या धडकेत दुचाकी चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उरुळी कांचन येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बुधवारी (ता. १०) दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये दुचाकी गाडी चक्काचूर झाली असून मोठे नुकसान झाले आहे.
अनिकेत जाधव (वय – १७, रा. लोणी काळभोर, ता. हवेली) असे अपघातात जखमी झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. त्याच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर उरुळी कांचन येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिकेत जाधव हा पुणे – सोलापूर महामार्गावरून उरुळी कांचनच्या बाजूने त्याच्याजवळ असलेल्या दुचाकीने निघाला होता. यावेळी बारा वाजण्याच्या सुमारास महामार्गावरील कोरेगाव मूळ हद्दीतील दुभाजकावरून प्रयागधाम गावाकडे एक टेम्पो निघाला होता. यावेळी अनिकेत जाधव याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व तो थेट टेम्पोच्या खाली गेला.
दरम्यान, या अपघातात त्याच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली असून दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला, अशी माहिती उपस्थित असलेल्या नागरिकांनी दिली. जखमी अनिकेतला कदम रुग्णवाहिकेचे वैभव कदम, सुरज जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ उरुळी कांचन येथील रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरु असून उरुळी कांचन पोलीस पुढील कार्यवाही करीत आहेत.
View this post on Instagram
गेल्या दोन दिवसांमध्ये तीन अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. याच परिसरात एका महिलेसह परप्रांतीय कामगाराचा मृत्यू झाला आहे. तर अनिकेत जाधवसह तिघेजण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उरुळी कांचन येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वाढत्या अपघातामुळे परिसरातील नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. तसेच परिसरातल्या महामार्गावरील वाहतुकीच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.