बारामती, (पुणे) : खाऊचे आमिष दाखवून एका १६ वर्षीय मुलाने परप्रांतीय साडेतीन वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला. ही घटना बारामती तालुक्यातील मेडद येथे शुक्रवारी (ता. २९) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले, तर मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे बारामती शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बारामतीपासून जवळच असलेल्या मेडद येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय इमारतीचे बांधकाम करण्यासाठी परप्रांतीय मजूर आले आहेत. याच कुटुंबातील साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर येथे किराणा मालाचे दुकान असलेल्या सोळा वर्षीय अल्पवयीन मुलाने खाऊचे आमिष दाखवून या मुलीवर अत्याचार केला.
दरम्यान, माळेगाव ग्रामीण पोलिसांनी या संदर्भात या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून, मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे अत्याचार प्रकरण समोर आल्यानंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.