उरुळी कांचन (पुणे) : तळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या एका १५ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना प्रयागधाम (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील तळ्यामध्ये घडली. सोमवारी (ता. ११) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. मृत मुलगा परप्रांतीय असून, त्याचे नाव व पत्ता अद्याप समजू शकले नाही.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, प्रयागधाम याठिकाणी कामगार कॉलनी आहे. या कामगार कॉलनीत अनेक परप्रांतीय मजूर राहतात. तसेच रस्त्याच्या बाजूला एक तळे आहे. या तळ्यात हा मुलगा एक वाजण्याच्या सुमारास पोहण्यासाठी गेला होता. खूप वेळ झाला तरी मुलगा घरी येत नसल्याने त्याचा शोध घेण्यात आला. परंतु तो आढळला नाही. तो पाण्यात बुडाल्याची माहिती मिळाली. त्याठिकाणी असलेल्या काही नागरिकांच्या मदतीने मृतदेह दुपारी बाहेर काढण्यात आला.
दरम्यान, त्याला पोहता येत नसतानाही तो तळ्यात उतरला. तसेच त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे त्याठिकाणी असलेले नागरिक सांगत होते. या वेळी परिसरातील नागरिकांनी तळ्याच्या ठिकाणी मोठी गर्दी केली होती.