दीपक खिलारे
इंदापूर : महाराष्ट्रासह देशभरातील लाखो भाविकांचे श्री बाबीर देव श्रद्धास्थान आहे. या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम भव्य झाले पाहिजे, असे नमूद करून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बाबीर देव मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामासाठी १५ लाखांची देणगी रुई येथे रविवारी (ता. १०) आयोजित भूमिपूजन प्रसंगी जाहीर केली. तसेच १ लाख रूपये रोख स्वरूपात दिले.
भूमिपूजन कार्यक्रमात बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की, श्री बाबीर देवाचे आशीर्वाद सतत आपल्या पाठीशी आहेत. १९९५ पासून एकही यात्रा चुकवलेली नाही. दिवाळीत देवाच्या यात्रेनिमित्त दर्शनासाठी आलो होतो. याप्रसंगी अमोल भिसे यांच्या गजी ढोल स्पर्धेतही सहभागी झालो होतो.
श्री बाबीर देवाचे दर्शन घेतल्यावर वेगळी ऊर्जा मिळते व त्यापासून निर्माण झालेला उत्साह सतत प्रेरणा देत असतो. श्री बाबीर देवाच्या भव्यदिव्य मंदिरामुळे व परिसराच्या विकासामुळे इंदापूर तालुक्याच्या वैभवात भर पडणार आहे, असे गौरवोद्गार हर्षवर्धन पाटील यांनी काढले.
इंदापूर तालुक्याला ऐतिहासिक मंदिरांचा वारसा लाभला आहे. नीरा नरसिंहपूर येथील श्री लक्ष्मी-नृसिंह मंदिर, श्री बाबीर देवाचे मंदिर यांचा त्यामध्ये समावेश आहे. आगामी काळातही श्री बाबीर देव मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामासाठी लागेल ते सहकार्य केले जाईल, असेही हर्षवर्धन पाटील यांनी या वेळी नमूद केले.