चंदननगर, (पुणे) : खराडी येथील एका खाजगी जलतरण तलावात आठवीत शिकणाऱ्या चौदा वर्षीय शाळकरी विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी (ता. १६) दुपारी अडीच ते साडे तीन वाजण्याच्या सुमारास संघर्ष चौकातील खालसा जिम येथील जलतरण तलावात घडली. अतिक नदीम तांबोळी (रा. गणेश नगर, वडगाव शेरी) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.
याप्रकरणी नदिम इस्माईल तांबोळी (वय-40 रा. गणेशनगर, वडगाव शेरी, पुणे) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन खालसा जिम मधील सुरक्षा रक्षक व व्यवस्थापक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदननगर भागातील संघर्ष चौकात खालसा जिम आहे. या जिमच्या आवारात जलतरण तलाव आहे. मगळवारी दुपारी अतिक आणि त्याचे मित्र जलतरण तलावात पोहण्यासाठी गेले होते. त्यावेळी दमछाक झाल्याने अतिक जलतरण तलावात बुडाला. अतिक तलावात बुडाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनी आरडाओरडा केला. व्यायामशाळेतील तरुणांनी पाण्यात बुडालेल्या अतिकला बाहेर काढले. त्याला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
मुलाच्या नातेवाईकांनी सांगितले की, अतिक नुकतेच पोहायला शिकला होता. तो त्याच्या मित्रांसोबत दुपारी पोहण्यासाठी खालसा जलतरण तलावात गेला होता. पोहायला गेल्यानंतर बुडून त्याचा मृत्यू झाला. त्यावेळी तेथे कोणीही सुरक्षा रक्षक उपस्थित नव्हते. तसेच तेथील सीसीटीव्ही कॅमेरे देखील बंद आहेत.
दरम्यान, तांबोळी कुटुंब हे सर्वसामान्य कुटुंब असून मागील बारा वर्षापासून वडगाव शेरी येथे वास्तव्यास आहे. अतिकचे वडील चालक म्हणून काम करतात. अतिकला दोन लहान भावंडे आहेत. गरीब घरातील हाताशी आलेल्या मुलाचा मृत्यू झाल्यामुळे वडगाव शेरीत शोककळा पसरली आहे.