पुणे: पोलिसांचा खबऱ्या असून चोरी व दरोडा टाकल्याची माहिती पोलिसांनी देतो, असे म्हणत 11 जणांच्या टोळक्याने एका ज्येष्ठ नागरिकासह दोघांवर तलवारीने सपासप वार करुन जखमी केल्याची घटना घडली आहे. तसेच आम्ही इथले भाई आहोत, कोणाला सोडणार नाही’ असे म्हणत वाहनांची तोडफोड करुन दहशत पसरवली. ही घटना हडपसर भागातील रामटेकडी येथील कोठारी व्हिल्सच्या बाजूला सोमवारी (ता. ०६) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी एका सराईत गुन्हेगारासह 11 जणांवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
रविसिंग शामसिंग कल्याणी, हुकूमसिंग रामसिंग कल्याणी, रामसिंग मोहनसिंग कल्याणी, अजयसिंग हुकूमसिंग कल्याणी, ऐलानसिंग रामसिंग कल्याणी, जिंदालसिंग रामसिंग कल्याणी, हिंदूसिंग रामसिंग कल्याणी, राजूसिंग रामसंग कल्याणी, निहालसिंग शामसिंग कल्याणी, सोनिहालसिंग शामसिंग कल्याणी, बसंतीकौर शामसिंग कल्याणी असे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पंजाबसिंग फौजिसिंग कल्याणी (वय-35 रा. कोठारी व्हिल्सच्या बाजूला, रामटेकडी, हडपसर) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या शेजारी राहतात. चोरी व दरोडा घातल्याची खबर पोलिसांना देतो, असा समज करुन आरोपींनी कटकारस्थान करुन बेकायदेशीर जमाव जमवला. त्यांनी त्यांच्या हातील लोखंडी तलवार व इतर हत्यारे घेवून फिर्यादी यांना शिवीगाळ करत धमकी दिली. तसेच आरोपी रविसिंग कल्याणी याने पंजाबसिंग यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या डोक्यात व पायावर तलवारीने वार करुन जखमी केले.
तर आरोपी हुकूमसिंग कल्याणी याने फिर्यादींच्या नातवाच्या डोक्यात तलवारीने वार करून गंभीर जखमी केले. हातातील हत्यारे हवेत उंचावून ‘आज यांची विकेटच पाडायची, कोणी त्यांना सोडवण्यास आले तर त्यांचीही विकेट टाकू. आम्ही इथले भाई आहोत, कोणाला सोडणार नाही’ अशी धमकी आरोपींनी दिली. तसेच फिर्यादी यांच्या मुलाच्या व नातवाच्या दुचाकीवर दगड व विटा मारुन नुकसान केले. तसेच इतर वाहनांची देखील तोडफोड करुन परिसरात दहशत पसरवली. आरोपींनी केलेल्या दगडफेकीमध्ये फिर्यादी यांच्या मुलाला व नातवाला मुका मार लागला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वानवडी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी ऐलानसिंग कल्याणी हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर खोपोली, रायसनी, नेरळ पोलीस ठाण्यात 9 गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत.