उरुळी कांचन, (पुणे) : मागील पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या खामगाव टेक (ता. हवेली) येथील १० वर्षाच्या मुलीचा शोध स्थानिक गुन्हे (ग्रामीण) शाखा व उरुळी कांचन पोलिसांना अद्याप लागलेला नाही. पाच दिवस होऊनही ही मुलगी कोठे आहे? याचा अद्यापही तपास लागला नसल्याने या प्रकरणाचे गूढ उकलण्याचे आव्हान उरुळी कांचन पोलिसांसमोर उभे राहिले आहे. अपहरण केल्याची घटना सोमवारी (ता. 20) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
पायल सुनिल धुळे (वय- 10, रा. खामगाव टेक, ता. हवेली) असे अपहरण करण्यात आलेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी सुनील बाळू धुळे (रा. खामगाव टेक, ता. हवेली) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव टेक परिसरात सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आरोपी याने याच्या त्याच्या ओळखी सांगितल्या. दरम्यान दिवसभर गावात फिरून झाल्यावर पायल ही चुलते व तिची चुलती यांच्याबरोबर घरी निघाली होती. मंदिर परिसरात आले असता आरोपी इसम हा त्यांच्याजवळ आला व त्याने चुलत्याला बोलण्यात गुंतवले. तसेच या-त्या ठिकाणची ओळख सांगून मुलीविषयी सर्व माहिती काढून घेतली.
पायलच्या चुलत्यांना दारू पिण्याची सवय असल्याची माहिती आरोपीने अगोदरच काढून घेतली होती. त्यानुसार त्यांना मोठ्या प्रमाणावर दारू पाजली. यावेळी चुलती यांना मुलीला घरी सोडतो, असे सांगितले. आरोपीने चलाखीने पायलला दुचाकीवर बसविले व त्या ठिकाणावरून निघून गेला. त्यानंतर पायलच्या चुलतीने ही माहिती पायलचे वडील सुनील धुळे यांना दिली. सदरची घटना मुलीच्या वडिलांना सांगितली. यावेळी परिसरातील खामगाव टेक, उरुळी कांचन तसेच सहजपूर परिसरातील सीसीटीव्ही तपासले. यावेळी सदर मुलगी ही त्या व्यक्तीच्या पाठीमागे बसल्याची एका ठिकाणी दिसून आली. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
दरम्यान, मागील चार ते पाच दिवसांपासून स्थानिक गुन्हे (ग्रामीण) शाखा व उरुळी कांचन पोलिसांकडून तपास सुरु आहे. यासाठी विविध ठिकाणी पथके रवाना करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे.
पोलिसांचा काळजीपूर्वक तपास सुरु
या घटनेला ५ दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्याप मुलीचा शोध लागलेला नाही. या प्रकरणातील मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पाच पथके तैनात करण्यात आली आहेत. प्रकरण नाजूक असल्यामुळे पोलिस काळजीपूर्वक तपास करत आहेत.
याबाबत बोलताना उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक नारायण देशमुख म्हणाले, “खामगाव टेक परिसरात हा माणूस कसा आला? तसेच मागील किती दिवसांपासून त्याचे या ठिकाणी वास्तव्य आहे. कोणाचा नातेवाईक आहे? याचा कसून तपास पोलिसांकडून सुरु करण्यात आला आहे. आरटीओ व सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांकडून तपास सुरु आहे. यासाठी ४ ते ५ पथके तैनात करण्यात आलेली आहेत, असे देशमुख यांनी सांगितले.