लोणी काळभोर, (पुणे) : दहावीमध्ये शिकणाऱ्या मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (ता. 15) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला आहे. कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील संभाजीनगर परिसरातील एंजल हायस्कूल शेजारी असणाऱ्या श्री कृपा वसाहतीत घडली आहे.
गोविंद सतीश रुपनावर, (वय -16, रा. संभाजीनगर, कदमवाकवस्ती, ता. हवेली, मूळ रा. लातूर), असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गोविंदचे वडील हे चारचाकी गाडी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. घरामध्ये आई, वडील, बहिण मुलगा असे चौघेजण एंजल हायस्कूल शेजारी असणाऱ्या श्री कृपा वसाहतीमध्ये राहतात. मागील एक महिन्यांपूर्वीच लातूरवरून सहकुटुंब कदमवाकवस्ती येथे राहण्यासाठी आले आहेत. तर गोविंद याने नुकताच लोणी काळभोर येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीसाठी प्रवेश घेतला होता.
दरम्यान, कदमवाकवस्ती परिसरात राहत असलेल्या मामाकडे गोविंद, त्याची आई, व बहिण हे तिघेजण रविवारी (ता.14) संध्याकाळी आठ वाजण्याच्या सुमारास जेवण करण्यासाठी गेले होते. यावेळी जेवण झाल्यानंतर संध्याकाळी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास गोविंद अभ्यास करायचा आहे, मी घरी जातो असे म्हणून मामाच्या घरातून निघून आला.
त्यानंतर गोविंदची आई आणि त्याची बहिण या दोघीही पाठीमागून घरी आल्या. त्यांनी वारंवार दरवाजा वाजवला, मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यावरून गोविंद झोपला असेल या कारणाने गोविंदची आई त्यांची बहिण राहत असलेल्या ठिकाणी झोपण्यासाठी गेल्या. सकाळी परत घरी आल्या असता पुन्हा दरवाजा वाजवला, तरीही गोविंदने दरवाजा उघडला नाही.
त्यामुळे त्यांनी एका कारागिराला बोलावून दरवाजा तोडला असता गोविंद याने राहत्या घरात गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्याला तत्काळ नागरिकांच्या मदतीने खाली घेतले. त्यास रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यापुर्वीच त्याचा मृत्यु झाला होता.
दरम्यान, याबाबत लोणी काळभोर पोलिसांनाही खबर देण्यात आली होती, त्यानुसार घटनास्थळी लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार ईश्वर भगत व नितेश पुंडे हे दाखल होत त्यांनी पंचनामा केला. गोविंद याने नेमकी का आत्महत्या केली याचे कारण अद्याप अस्प्ष्ठ असून त्यानुसार पोलिसांनी पुढील कार्यवाही सुरु केली आहे. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही.