लोणी काळभोर : पुण्यात वाहतूक नियमांचे पालन न केल्यामुळे अपघाती मृत्यूंची संख्या वाढत आहे. अनेकांना शारीरिक अपंगत्व आले आहे. आपला जीव वाचविण्यासाठी सर्व नागरिकांनी हेल्मेट घालणे अत्यंत आवश्यक आहे. या धावपळीच्या जगात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस कर्मचारी आपल्या जीवाची बाजी लावतात. म्हणून त्यांनाही
आता मोफत हेल्मेटचे वाटप करण्यात आले.
लोणी काळभोर (ता. हवेली) पोलीस ठाण्यात सेवा सहयोग फौंडेशन व रिच ट्रस्ट यांच्या वतीने शनिवारी (ता.३०) मोफत १०० हेल्मेट वाटप करण्यात आले. यावेळी पोलिस उपायुक्त आर. राजा, सेवा सहयोग फौंडेशनचे वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक मकरंद सातभाई, प्रकल्प समन्वयक रोहित झगडे, रिच ट्रस्टच्या संस्थापिका नीलिमा पाटील, जितेंद्र मोहन, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दत्ताराम बागवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत तरटे, पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख, हवालदार रामदास मेमाणे, रवी आहेर, पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना मकरंद सातभाई म्हणाले की, ‘प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेट वापरणे काळाची गरज आहे. कारण प्रत्येकाचा जीव महत्त्वाचा आहे. नागरिकांबरोबरच पोलिसांचीही सुरक्षा अत्यंत महत्वाची आहे. हा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेऊन सुरक्षित प्रवासासाठी पोलिसांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले आहे’.
दरम्यान, रस्ता सुरक्षेची सामाजिक जबाबदारी ओळखून सेवा सहयोग फौंडेशन व रिच ट्रस्टकडून पुणे जिल्ह्यात तब्बल १६ हजार हेल्मेटचे मोफत वाटप सुरू आहे. त्यांच्या या अभिनव उपक्रमाचे लोणी काळभोर पोलिसांकडून भरभरून कौतुक होत आहे.
जीवितहानी टळण्याची शक्यता; पोलिसांना होणार फायदा
लोणी काळभोर पोलिसांना हेल्मेट वाटप केल्याने अपघातात होणारी जीवितहानी टळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यापूर्वी अनेक पोलिसांचे अपघात झाले होते. आता हेल्मेटचे वाटप झाल्याने पोलिसांना सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मोठा फायदा होणार आहे.