पुणे : पुणे पोलिसांनी गेल्या २ दिवसात विश्रांतवाडी, कुरकुंभ आणि दिल्ली येथे कारवाई करुन तब्बल २ हजार २०० कोटी रुपयांचे ११०० किलोपेक्षा अधिक एमडी ड्रग्ज जप्त केले होते. त्यानंतर आता पुणे पोलिसांनी सांगलीत धड टाकत मोठी कारवाई केली आहे. तब्बल १० किलो एमडी मिठाच्या पाकिटातून जप्त करण्यात आले आहे. सांगलीतून कुरिअरद्वारे ते ड्रग्ज पुढे पाठवले जाणार होते. अशातच पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली आहे. अजून ५० किलो एमडी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पुणे जिल्ह्यातील कुरकुंभ एमआयडीसीमधील अर्थकेम कारखान्यावर पोलिसांनी छापा मारून जवळपास ६०० किलोपेक्षा अधिक एम डी जप्त केले होते. पोलिसांनी कंपनी मालक साबळे आणि त्याच्यासाठी एम.डी.चा फॉर्म्युला तयार करणाऱ्या केमिकल इंजिनिअरला ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, कंपनीतून पुणे शहर, दिल्ली, मुंबई, मिरा-भाईंदर, बंगलोर आणि हैद्राबाद अशा मेट्रोसिटीत एमडीची पुरवाठा केल्याचे लक्षात आल्याने अनेक राज्यात पथके रवाना करण्यात आली आहेत.
कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत औषध निर्मितीच्या नावाखाली मेफेड्रोन या अमली पदार्थाची निर्मिती केली जात होती. हैदर शेख यांच्या विश्रांतवाडी येथील गोदामामधून ५५ किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. या गोदामामध्ये मीठ आणि रांगोळीचा साठा करून ठेवण्यात आला होता. पांढऱ्या क्रिस्टल्स प्रमाणे दिसणारे मेफेड्रोन हे छोट्या छोट्या पाकिटांमध्ये भरून ही पाकिटे मिठाच्या मोठ्या पाकिटांमध्ये लपवण्यात आली होती.
पुण्यात तब्बल ११०० कोटीचे अमली पदार्थ जप्त
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पुण्यात तब्बल ११०० कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे अमली पदार्थ जप्त केले असून या प्रकरणी आतापर्यंत ३ जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ६५० किलो पेक्षा अधिक वजनाचे मेफेड्रॉन म्हणजेच एमडी सापडले आहे. या संपूर्ण प्रकरणाचे धागेदोरे फक्त देशातच नसून इतर देशात देखील पोहोचलेले आहे. याचा सखोल तपास सुरू आहे.