बारामती : विधासभा निवडणुकीच्या पार्शभूमीवर बारामती आणि इंदापूर तालुक्यात १ हजार ४३४ पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. निवडणूक भयमुक्त व शांततेच्या वातावरणात पार पडावी, यासाठी पोलिस ठाण्यांकडून पथसंचलन, तसेच प्रतिबंधात्मक कारवाया केल्या जात आहेत, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांनी दिली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अप्पर पोलिस अधीक्षक गणेश विरादार यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती विधानसभेसाठी डॉ. राठोड, तर इंदापूर विधानसभेसाठी उपअधीक्षक मधुकर भाटे यांना पोलिस प्रशासनाकडून पर्यवेक्षकीय अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
बारामती विधानसभा मतदारसंघात बारामती शहर-तालुका, माळेगाव, वडगाव निंबाळकर व सुपा, तर इंदापूरमध्ये इंदापूर, वालचंदनगर, भिगवण पोलिस ठाणी आहेत. या पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी, पोलिस अमंलदार, गृहरक्षक दलाचे जवान यांच्याकडून गुन्हेगारीवर नियंत्रण व समूळ उच्चाटन करणे, निवडणूक कालावधीत दहशत निर्माण करणारे, वारंवार गुन्हे करणारे, अवैध धंद्यांना खतपाणी घालणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.
पोलिसांचा सक्रिय सहभाग जनतेच्या नजरेत यावा वासाठी आणि गुन्हेगारांवर जरब राहावी यासाठी सीमा सुरक्षा बलाच्या जवानांच्या मदतीने पथसंचलन केले जात असल्याचे डॉ. राठोड यांनी सांगितले.
बारामती व इंदापूर तालुक्यात विधानसभा निवडणूक कालावधीत अवैध दारूची विक्री होऊ नये, यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. इंदापूर तालुक्यात आचारसंहिता र ल्यापासून आजवर ११० कारवाया करीत १ लाख ६३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगाराच्या २० केसेस करत ४१ जणांवर गुन्हा दाखल करून १ लाख ६७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर बारामती तालुक्यात दारूबंदीच्या १०३ कारवायांत ४ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच जुगाराच्या ४ कारवाया केल्याचे डॉ. राठोड यांनी सांगितले.
बारामती, इदापूर तालुक्यातील बंदोबस्त
- पोलिस अंमलदार : ७८०
- होमगार्ड : ५६९
- सीमा सुरक्षा बल : ८५