उरुळी कांचन, (पुणे) : नायगाव (ता. हवेली) गावच्या हद्दीतील 14 महिन्यांचा तोडीस आलेला एक एकर ऊस वीजतारांच्या शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. जवळपासच्या शेतकऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केल्याने मोठी दुर्घटना टळली. शुक्रवारी (ता. 04) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. विद्युत वाहिनीच्या तारा शेतात लोंबकळत असल्याने शॉर्टसर्किटमुळेच आग लागल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे. कोंडीबा रामचंद्र गुळूंजकर (रा. नायगाव, ता. हवेली) असे नुकसान झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नायगाव ग्रामपंचायत हद्दीत कोंडीबा गुळूंजकर यांची शेती आहे. गट नंबर – 62 मधील शेतीत गेल्यावर्षी एक एकर उसाची लागण केली असून तोडणीसाठी ऊस उभा होता. तसेच या क्षेत्रातून महावितरणच्या वीजवाहक तारा गेल्या आहेत. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास अचानक शॉर्ट सर्किट होऊन त्याच्या ठिणग्या ऊसाच्या फडात पडल्या.
त्यानंतर उसाला आग लागली आणि बघता बघता आगीने रौद्ररुप धारण केले. यामध्ये 1 एकर ऊस जळून खाक झाला असून दीड ते पाऊणे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत महावितरणअधिकाऱ्यांशी संपर्क साधला असून सदर घटनेचा पंचनामा विद्युत निरीक्षकडून केला जाणार आहे. त्यानंतर आगीचे कारण समोर येईल असे सांगण्यात आले आहे.
याबाबत नुकसानग्रस्त शेतकरी कोंडीबा गुळूंजकर म्हणाले, “या भागात थोडासा वाऱ्याचा जोर असल्यामुळे वीजवाहिन्या एकमेकांना लागून झालेल्या शॉर्टसर्किटमुळे तोडीस आलेला एक एकर ऊस जाळून खाक झाला आहे. याबाबत महावितरणच्या कर्मचाऱ्यांना वारंवार सूचना दिली होत्या. शेतातील जुन्या वीजतारा तत्काळ बदलावेत व नुकसानभरपाई द्यावी.”