पुणे : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग राज्य सरकारने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे (एनएचआय) हस्तांतरित केल्यानंतर त्यांनी या कामाला मंजूरी दिली व त्यातील झेंडेवाडी (ता. पुरंदर) ते लोणंद या कामाची निविदा निघाल्यानंतर आता कामालाही सुरूवात झाली आहे.
हडपसर ते झेंडेवाडी हा मार्ग दिवे घाट भागातील भाग वनविभागाच्या हद्दीतील असल्याने वन विभागाची परवानगी नसल्याने हा रस्ता रखडला होता. या मार्गाला परवानगी मिळावी यासाठी माजी सदनी अधिकारी संभाजी झेंडे यांनी शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्यास यश आल्याने वनविभागाने देखील या रस्त्याच्या कामासाठी परवानगी दिली आहे.
दरम्यान, या चौपदरीकरणाच्या कामासाठी मुख्य रस्त्याचे डांबरीकरण आणि फुरसुंगी रेल्वे लाइनवर रेल्वे ओव्हर ब्रीज बांधण्यात येणार आहे. वडकी व उरळी देवाची रस्त्याच्या प्रवेशद्वाराजवळ अंडरपास आणि मंतरवाडी चौकात तसेच एसपी इन्फोसिटी सेंटरसमोर उड्डाणपूल (फ्लायओव्हर) उभारण्यात येणार असल्याने हा मार्ग व्यवस्थित आणि वाहतुकीस सुरळीत होणार आहे