लोणी काळभोर : फुरसुंगी आणि उरुळी देवाची या दोन्ही गावांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतून या दोन्ही गावांना हद्दपार करण्यात आले आहे. या गावांना वगळून नव्याने फुरसुंगी- उरळी देवाची नगरपरिषद स्थापन करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश राज्य सरकारकडून काढण्यात आले आहे. राज्या सरकारच्या या निर्णयामुळे आता पुणे मनपा हद्दित बदल झाला आहे. हे आदेश उप सचिव अनिरूध्द व्यं. जेवळीकर यांनी आज काढले आहेत.
फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही दोन्ही गावे २०१७ मध्ये पुणे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट करण्यात आली होती. मात्र, या गावांतील मिळकतींना मोठ्या प्रमाणात मिळकतकर लावण्यात आल्याने या गावांतील नागरिक आणि व्यापारी यांनी कर कमी करण्याची मागणी केली होती. मात्र, महापालिकेकडून कर कमी करण्यात न आल्याने ही गावे महापालिकेतून वगळण्याची मागणी करण्यात आली होती.
दरम्यान माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बैठक घेऊन त्यासाठी पाठपुरावा केला. त्यानंतर ही गावे वगळून या दोन गावांची नगर परिषद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी शहर सुधारणा समितीची बैठक घेऊन गावे वगळण्याचा प्रस्ताव मंजूर केला. त्यानंतर सर्वसाधारण सभेच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. त्याआधारे आता राज्य सरकारने ही गावे महापालिका हद्दीतून वगळून ‘फुरसुंगी- उरळी देवाची नगरपरिषद’ स्थापन करण्याबाबतचा अध्यादेश काढला आहे. त्यामुळे ही गावे आता महापालिका हद्दीतून वगळली गेली आहेत.
पुणे महापालिकेची नवीन हद्द
फुरसुंगी – स.नं. 193, 192 पै, 194, 195 पै, (कचरा डेपो) चे क्षेत्र वगळून गावठाणासह संपुर्णमहसुली गावाचे क्षेत्र
उरूळी देवाची – स.नं. 30,31 व 32 पै, (कचरा डेपो) चे क्षेत्र वगळून गावठाणासह संपुर्ण महसुली गावाचे क्षेत्र
पुणे महानगरपालिकेची सुधारित हद्द
उत्तर – कळस, धानोरी व लोहगाव या महसुल गांवाची हद्द
उत्तर पुर्व – लोहगाव, वाघोली या महसुल गावांची हद्द
पूर्व – मांजरी बु., शेवाळेवाडी, हडपसर या महसूली गावांची हद्द व फुरसुंगी महसुली गावातील कचरा डोपोची हद्द
दक्षिण पुर्व – महंमदवाडी, होळकरवाडी, औताडे हांडेवाडी या महसूली गावांची हद्द व उरूळी देवाची महसुली गावातील कचरा डेपोची हद्द
दक्षिण – धायरी, वडाचीवाडी, येवलेवाडी, कोळेवाडी, भिलारेवाडी या महसूली गावांची हद्द
दक्षिण-पश्चिम – पश्चिमेस नांदेड, खडकवासला, नांदोशी सणसनगर, कोपरे या महसूली गावांची हद्द
पश्चिम – कोंढवे धाडवे, बावधन बु. व खुर्द, म्हाळुंगे, सुस या महसुली गावांची हद्द
पश्चिम-उत्तर – बाणेर, बालेवाडी या महसूली गावांची हद्द व पुणे महानगरपालिकेची जुनी हद्द