हनुमंत चिकणे
उरुळी कांचन, (पुणे) : ज्ञानज्योती सावित्रीबाईंचे जीवन मानवतावादी आणि धर्मनिरपेक्ष आदर्श समाज व्यवस्था निर्मितीसाठी प्रेरणादायी व क्रांतीची धगधगती मशाल असल्याचे प्रतिपादन व्यापारी आघाडीचे भाजपा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास जगताप यांनी केले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांच्या १९२ व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी उरुळी कांचन शहर तर्फे उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील पांढरस्थळ परिसरात असलेल्या जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी विकास जगताप बोलत होते.
यावेळी उरुळी कांचन भाजपाच्या वतीने मुख्याध्यापक कुंजीर, खेडेकर, बागवान यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी भाजपा पुणे जिल्हा सहकोशाध्यक्ष श्रीकांत कांचन, भाजपा पुणे जिल्हा युवती मोर्चाच्या उपाध्यक्ष पूजा सणस, माजी उपसरपंच युवराज कांचन, भाजपा उरुळी कांचन शहराध्यक्ष अमित कांचन, अक्षय बंटी कांचन, साक्षी ढवळे, बाळासाहेब कांचन, महेंद्र कांचन आदी मान्यवर उपस्थित होते.
यापुढे बोलताना विकास जगताप म्हणाले, सर्व राष्ट्रपुरुषांचे कार्य समाजासाठी दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक असल्याने उरूळीकांचन मध्ये एकत्रितरित्या सर्व राष्ट्रपुरुषांचे मिळून एक स्मारक तयार करण्यात यावे. तसेच माता-पित्यांनी किंवा कुटुंबातील वरीष्ठांनी आपला भारतीय इतिहास, संस्कृती आणि संस्कार आपल्या मुलांमध्ये रुजवावेत तरच शक्तिशाली भारताची निर्मिती होईल.
दरम्यान, श्रीकांत कांचन यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठीची पहिली शाळा, अस्पृश्यांसाठी शाळा, प्रौढांसाठी शाळा, बालहत्या प्रतिबंधक गृह, विधवा स्त्रियांसाठी वसतीगृह व केशवपनास विरोध, अंतरजातीय विवाह तसेच सत्यशोधक समाज व्यवस्थेसाठीचे कार्य याविषयी सविस्तर माहिती सांगितली. तसेच माजी उपसरपंच युवराज कांचन यांनी सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले या दांपत्याने समाजातील अनिष्ट रूढी परंपरा आणि अंधश्रध्देवर प्रखर प्रहार केला असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा सणस यांनी केले तर आभार मुख्याध्यापक कुंजीर सर यांनी आभार मानले.