पिंपरी : परिसरातील काळेवाडी येथे एक धक्कादायक घटना उघडकीला आली आहे. पित्याने आठ वर्षीय चिमुकलीचा गळा आवळून निर्घृण खून केला, त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. काळेवाडी येथे मंगळवारी (ता. १९) पहाटे पाचच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. भाऊसाहेब भानुदास बेदरे (४३, रा. गुरुनानक नगर, थेरगाव, मूळ रा. बेदरेवाडी, ता. पाटोदा, जि. बीड) आणि नंदिनी भाऊसाहेब बेदरे (वय ८) अशी मृतांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेदरे कुटुंब १५ वर्षांपासून उदरनिर्वाहासाठी पिंपरी-चिंचवड शहरात वास्तव्यास आहे. भाऊसाहेब बेदरे खासगी नोकरी करत होते. काही महिन्यांपूर्वी नोकरी गेल्याने ते कारचालक म्हणून काम करत होते. मात्र त्यातूनही तुटपुंजे उत्पन्न मिळत नसल्याने त्यांना आर्थिक चणचण भासत होती. यामुळे ते तणावाखाली होते. दरम्यान, भाऊसाहेब यांची पत्नी राजश्री गावी गेली होती. सोमवारी (ता. १८) रात्री त्या गावाकडून निघाल्या. मंगळवारी पहाटे चार वाजता पुण्यातील शिवाजीनगर येथे पोहचल्यावर त्यांनी पती भाऊसाहेब यांना फोन केला. तुम्ही गाडी घेऊन या, असे त्यांनी भाऊसाहेबांना सांगितले. मात्र, भाऊसाहेब आले नाहीत. त्यामुळे त्या स्वतःच घरी पोहचल्या. त्यावेळी घरात झोपलेला त्यांचा १५ वर्षीय मुलगा आशिष याने दरवाजा उघडला. मुलगी नंदिनीला जागे करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने प्रतिसाद दिला नाही. तर पती भाऊसाहेब यांनी स्वयंपाक खोलीत गळफास लावून घेतल्याचे आढळून आले.
दरम्यान, या घटनेची माहिती तत्काळ वाकड पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. भाऊसाहेब आणि नंदिनी यांना तत्काळ पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती उघड
भाऊसाहेब यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांना मिळाली आहे. गावाकडे असलेली जागा विक्री केली. मात्र, त्यातील काही रक्कम मिळालेली नाही, असे सुसाईड नोटमध्ये लिहिलेले आढळले. यामुळे आत्महत्येमागील प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र, खून आणि आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वाकड पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.