अरुण भोई
दौंड (पुणे) : अज्ञात कारणावरून ७ जणांच्या टोळक्याने एका चारचाकी चालकाला कोयता, लोखंडी रॉड व दगडाने बेदम मारहाण केली. तसेच चारचाकी गाडीवर दगड मारून नुकसान केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. खानोटा (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीतील अदम शेख याच्या घराजवळ सोमवारी (ता. २५) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
रामराजे संभाजीराव राजेभोसले (वय २२, व्यवसाय- शेती, रा. खानोटा, ता. दौंड) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कुणाल विलास जाधव, विलास तुकाराम जाधव, राजेंद्र तुकाराम जाधव, विवेक राजेंद्र जाधव, अश्विनी राजेंद्र जाधव, शारदा दत्तात्रय जाधव, रूपा विलास जाधव (सर्व रा. खानोटा, ता. दौंड) यांच्यावर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामराजे राजेभोसले हे त्यांच्या चारचाकी गाडीतून खानोटा गावात्रून घराकडे निघाले होते. रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास अदम शेख याच्या घराजवळ आले असता, वरील ७ आरोपींनी राजेभोसले यांना कोयत्याने, लोखंडी रॉड, दगडाने मारहाण करून दुखापत केली. तसेच शिवीगाळ करून दमदाटी केली.
या प्रकाराबाबत प्रतिक्रीया देताना खानवटे येथील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष दीपक ढवळे म्हणाले की, गावात झालेला प्रकार हा अतिशय निंदनीय आहे. आपण एकाच गावात राहतो. गावातील वातावरण न बिघडवता सामाजिक सलोखा ठेवावा. चुकीचे कृत्य करणाऱ्याला कडक शासन झाले पाहिजे.
दरम्यान, या प्रकरणी राजेभोसले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वरील ७ जणांवर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार चव्हाण करीत आहेत.