उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन येथील शिंदवणे ग्रामपंचायत हद्दीतील खेडेकर मळा परिसरात दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातात एकजण ठार झाला तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी (ता.८) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली.
रामभाऊ लक्ष्मण चौधरी (वय ५५, रा. शिंदवणे, ता. हवेली) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर नामदेव बबन कुंजीर (वय ३४, रा. भिवरी, ता. पुरंदर) असे अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिंदवणे ग्रामपंचायत हद्दीतील खेडेकर मळा परिसरात हा अपघात झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच कदम रुग्णवाहिकेचे वैभव कदम व कस्तुरी प्रतिष्ठानचे सहकाऱ्यांनी व शिंदवणे येथील नागरिकांनी तात्काळ मदत केली.
दरम्यान, जखमी झालेल्या दोन्ही व्यक्तींना रुग्णवाहिकेतून उरुळी कांचन येथील सिद्धिविनायक रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यात रामभाऊ चौधरी यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. तसेच नामदेव कुंजीर यांना पुढील उपचारासाठी पुण्यातील एका बड्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघाताची महिती लोणी काळभोर पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पोलीस करत आहेत.
मागील १० दिवसात दुसरा अपघात..
उरुळी कांचन येथील शिंदवणे ग्रामपंचायत हद्दीतील वाकवस्ती परिसरात रविवारी (ता. ३१ डिसेंबर) दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने या अपघातात एका तरुणाचाहि जागेवरच मृत्यू झाला होता. तर या अपघातात एका महिलेसह पुरुष जखमी झाल्याची घटना घडली आहे.