उरुळी कांचन (पुणे) : नवीन उरुळी कांचन पोलीस ठाणे सुरु करण्याबाबतच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे विभाजन करून नवीन उरुळी कांचन पोलीस ठाणे उभारले जाणार आहे. मात्र, आता याच्या उभारण्याच्या हालचालींना वेग आला असून, उरुळी कांचनकरांना नववर्षाची भेट मिळणार आहे. पुढील एक ते दोन दिवसांत उरुळी कांचन स्वतंत्र पोलीस ठाणे सुरु होणार आहे. याबाबतच्या वृत्ताला ‘पुणे प्राईम न्यूज’शी बोलताना पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी दुजोरा दिला.
उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या पहिल्या पोलीस निरीक्षकपदी भोर पोलीस ठाण्यातील शंकर मनोहर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. पण पोलीस ठाणे कधी सुरू होणार याची चर्चा सुरु असतानाच आता हे नवीन पोलिस ठाणे येत्या दोन-तीन दिवसांत अस्तित्वात येणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. या पोलिस ठाण्याच्या निरीक्षकपदी शंकर पाटील यांची नियुक्ती पोलिस ठाणे सुरू झाल्यानंतर होईल, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्य सरकारने नवीन उरुळी कांचन पोलीस ठाणे निर्माण करण्यास डिसेंबर २०२१ मध्ये मान्यता दिली. या संदर्भातील आदेश १३ डिसेंबर २०२१ रोजी गृहविभागाचे तत्कालीन सहसचिव कैलास गायकवाड यांनी काढला होता. स्वतंत्र पोलीस ठाणे तयार करण्यासाठी ६ कोटी ४८ लाख २७ हजार ३०० रुपयांच्या खर्चास मान्यताही देण्यात आली आहे. यासाठी शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी या संदर्भात वेळोवेळी पाठपुरावा केला होता.
सोशल मीडियात लोणी काळभोर पोलीस ठाणे पुन्हा ग्रामीण हद्दीत जाणार असा ‘जीआर’ गेल्या काही दिवसांपासून फिरत होता. लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेले उरूळी कांचन पोलीस चौकीला स्वतंत्र पोलिस ठाण्याचा दर्जा मंजूर झाला आहे. त्याच्या निर्मितीनंतर ते जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत राहणार आहे. उरूळी कांचन पोलीस ठाणे निर्माण करण्याची अधिसूचना शासनाने काढली आहे. परंतु, उरुळी कांचन पोलीस ठाण्यासाठी जिल्हा ग्रामीण पोलीस दलाकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने गेले दोन वर्षे ते सुरू होऊ शकले नाही.
पोलीस ठाण्यात एकूण १०० पदे भरली जाणार
उरुळी कांचन पोलीस ठाण्यात एक पोलीस निरीक्षक, ४ सहाय्यक पोलिस निरीक्षक, ५ उपनिरीक्षक, १५ सहाय्यक फौजदार, २० पोलीस हवालदार, पोलीस नाईक २५, तर पोलीस शिपाई ३० पदे भरली जाणार आहेत.
कायदा सुव्यवस्था राखताना पोलिसांना अतिरिक्त ताण
उरुळी कांचन व परिसर औद्योगिकदृष्ट्या विकसित होत आहे. शैक्षणिक, अभियांत्रिकी, वैद्यकीयसह स्पर्धा परीक्षा केंद्रामुळे तालुका, बाहेरील विद्यार्थ्यांचा ओढा आहे. स्थानिक, परप्रांतिय मजूरही येत असल्याने व वाढत्या उपनगरांमुळे कायदा सुव्यवस्था राखताना पोलीसांना ताण सहन करावा लागतोय. कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी नव्या पोलीस ठाण्याची गरज होती.
अपघातग्रस्त वाहने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात जमा
पुणे-सोलापूर महामार्गावर अपघात झालेली तसेच महसूल विभागाने कारवाई करून जप्त केलेली वाहने, दुचाकी, चारचाकी वाहने लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणून ठेवली आहेत. तसेच पोलीस ठाण्याचा परिसराची साफसफाई करण्यात आली आहे.