पुणे : कुस्तीपटूंना मानधनासोबतच निवृत्तीवेतन आणि वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद व संस्कृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने कुस्ती महर्षी स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरी कोथरुड इथे आयोजित ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२२-२३ च्या उद्घाटन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
१० ते १४ जानेवारी २०२३ या कालावधीत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातून सुमारे ९५० कुस्तीपटू सहभागी झाले असल्याची माहिती आयोजक आणि पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
यापुढे बोलताना पाटील म्हणाले, “महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे उत्तम नियोजन मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे. या निमित्ताने मोठे मैदान, आकर्षक बक्षिसे तसेच खेळाडूंसाठीही उत्तम व्यवस्था करण्यात आली. तसेच राज्य शासनाने राज्य स्तरावर पदक प्राप्त करणाऱ्या खेळाडूला वर्ग तीनच्या पदावर, राष्ट्रीय स्तरावर पदक प्राप्त करणाऱ्या खेळाडूला वर्ग दोनच्या पदावर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक प्राप्त करणाऱ्या खेळाडूला वर्ग एकच्या पदावर थेट नियुक्ती देण्याचा निर्णय घेतला आहे.”