दौंड : मळद (ता. दौंड) ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच ॲड. मोहिनी बापूराव भागवत (शेलार) यांनी गगन भरारी घेतली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत त्यांनी धवल यश प्राप्त करत केल्याने त्यांची प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारीपदी विराजमान होणार आहेत. ॲड. मोहिनी भागवत या सरपंचापासून न्याय दंडाधिकारी होणाऱ्या राज्यातील प्रथम महिला ठरल्या आहेत.
ॲड. मोहिनी भागवत या मळद गावच्या सरपंच आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने न्यायाधीश पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत भागवत या राज्यातून पाचव्या आल्या आहे. लोकशाहीच्या एका स्तंभातून दुसऱ्या स्तंभाकडे त्यांनी वाटचाल केली आहे. म्हणजेच राजकारणातून न्यायव्यवस्थेकडे जाण्याचा पराक्रम ॲड. मोहिनी भागवत (शेलार) यांनी केला आहे.
दरम्यान, ॲड. मोहिनी यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी शेतकरी कुटुंबातून शिक्षण विधी शाखेची पदवी पूर्ण केली आहे. त्यानंतर त्यांचा विवाह ॲड. बापूराव भागवत यांचीशी झाला. ॲड बापूराव भागवत हे दौंड तालुका भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत. बापूराव यांनीही मोहिनी यांना नेहमी प्रोत्साहित केले. त्यामुळे मोहिनी यांना एमपीएससीचा अभ्यास सुरु केला. व आता या परीक्षेत यश मिळवले.